लोकसत्ता वार्ताहर

कराड : जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधी पक्षांचा जागोजागी पराभव होवून मोठे नुकसान झाले, विरोधकांचा आकार एकदम छोटा झाल्याने आता विधानसभेत विरोधीपक्ष नेताही आपण मिळवू शकलो नाही, अशी हताश भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री विलासकाका उंडाळकरांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त उंडाळे (ता. कराड) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे होते. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी वाचा-अलिबागजवळ समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली, १५ खलाशी सुखरूप

कराड दक्षिण, कराड उत्तरच्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्यात ज्या पद्धतीने राजकारण घडले ते चांगले नव्हते, अशी खंत व्यक्त करून जयंत पाटील म्हणाले, की एकमेकांच्या जिरवा जिरवीतून आपण आपले पक्ष मागे खेचल्याचे भान ठेवावे. आतातरी पक्ष कार्यकर्त्यांनी शहाणपणाने वागावे, मैदानात उतरताना फार शत्रू झाल्याने आपणास पुढे जायला अडचण होते, दुसऱ्याला खेचण्यापेक्षा आपण पुढे जाण्याचा विचार ठेवून समझोता करायचा असतो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता थांबा आणि मला कधीतरी खासगीत बोलवा, मग मी आपली शिकवणी घेतो अशा शब्दांत जयंत पाटील यांनी उदयसिंह पाटील व ‘कराड उत्तर’चे मावळते आमदार बाळासाहेब पाटील यांना कानपिचक्या दिल्या.

आणखी वाचा-“HMPV विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, रुग्णालय अधिष्ठातांनी सज्ज राहणं आवश्यक”; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विलासकाकांसारखा विलक्षण नेता आपण पाहिला नाही. राज्यातील अनेक नेते त्यांचे सल्ले घेत, त्यांनी वैचारिक संघर्ष केला पण, काँग्रेसची विचारसरणी कधीही सोडली नाही, पक्षाच्या विचारसरणीशी ते प्रामाणिक राहिले. आज निर्माण झालेली राजकीय परिस्थिती विलासकाकांच्या विचारांना अभिप्रेत नाही, भाजपला चंचू प्रवेशही नसणाऱ्या सातारा जिल्ह्यात आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णतः पराभूत होत असल्याची खंतही जयंत पाटलांनी व्यक्त केली. कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, उदयसिंह पाटील यांचीही भाषणे झाली.