महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात ११ महिने प्रदीर्घ सुनावणी झाली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल जाहीर केला. कोर्टाने सरकारच्या आणि राज्यपालांच्या कारभारावर ताशेरे ओढले खरे परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कायम राहिलं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निर्णय घेतील. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांना विश्वास आहे की, हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल आणि शिंदे गटातील १६ आमदार अपात्र होतील. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र वेगळं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार सोमवारी पत्रकारांशी बातचित करताना म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. २८८ पैकी यदाकदाचित त्या १६ आमदारांचा निकाल काही वेगळा (आमदार अपात्र ठरले) लागला. वेगळा निकाल लागणारच नाही म्हणा. पण समजा लागला तरी त्या निकालाचा सरकारच्या बहुमतावर कुठलाही परिणाम होणार नाही.

दरम्यान, आता अजितदांदाचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या विसंगत मत व्यक्त केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर हे सरकार जाणार.

जयंत पाटील म्हणाले, या १६ आमदारांमध्ये एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. मुख्यमंत्रीच जर अपात्र ठरले तर हे सरकार जाणार. कारण जेव्हा मुख्यमंत्री जातो तेव्हा सरकारही जातं. राहिला प्रश्न बहुमताचा, तर २८८ पैकी १६ आमदार गेले तर बाकी शिवसेना सदस्य जे शिंदे गटात आहेत त्यांचा विचार बदलू शकतो. ते कदचित पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जातील. मग सरकार बदलणार. मुख्यमंत्री अपात्र ठरले आणि त्यांचा राजीनामा आला तर नव्या सरकारच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. विधानसभेत ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य आहेत त्यांना राज्यपाल सत्तास्थापनेचं आमंत्रण देऊ शकतात. त्यांनी बहुमत सिद्ध केलं तर त्यांचं सरकार बनेल. पण बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर सत्ताबदल होऊ शकतो.

अजित पवारांचं मत वेगळं का?

अजित पवार म्हणाले महाराष्ट्राच्या विधानसभेतील २८८ पैकी १६ आमदार अपात्र ठरले तर राहतात २७२ आमदार, मग बहुमताचा आकडा कमी होतो. तेवढं बहुमत त्यांच्याकडे (भाजपाकडे) आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा काहिही परिणाम सरकारवर होईल असं आत्तातरी दिसत नाही.

हे ही वाचा >> लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? जयंत पाटील म्हणाले, “आम्ही तिकीटवाटप…”

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचा गट (शिवसेना) आणि भारतीय जनता पार्टीकडे बहुमत असल्याने ते सत्तेत आहेत. त्यांच्यापैकी १६ आमदार जर अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा १३७ इतका कमी होईल (जो आता १४५ इतका आहे) आणि तितके आमदार शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाकडे आहेत. असं अजित पवारांना सुचवायचं होतं. तसेच हे आमदार अपात्र ठरणार नाहीत असा विश्वासही त्यांना वाटतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil shinde fadnavis govt will collapsed if 16 mla disqualified asc
First published on: 16-05-2023 at 17:15 IST