Jitendra Awhad तुळजाभवानी मंदिराची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे आज धाराशिव जिल्ह्यात गेले होते. मंदिराच्या विकासाबाबतची त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाला विरोध नाही. तर ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मंदिरातील वास्तु आणि गाभारा काहीही झालं तरी पाडू देणार नाही असा इशारा दिला. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाड यांची गाडी अडवली. जितेंद्र आव्हाड यांनी देवीचा अपमान केल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय?

“इतिहासाचा खून तोही आपल्या डोळ्यांदेखत!”

१) तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास.

२) पहिली रचना अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.

३) छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली.

४) अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे.

पण आता, “विकास” या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे! इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार?

विकास म्हणजे वारसा संपवणं नाही!

छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे ती संस्कृतीवरची तोडफोड आहे! आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो?
उद्या कदाचित सांगावं लागेल “इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुनं मंदिर होतं, मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं!” आता आवाज उठवा!
ही फक्त वास्तू नाही, हा आपला इतिहास, आपली ओळख, आपली अस्मिता आहे. मंदिर वाचवण्यासाठी, हा पोस्ट शेअर करा. #SaveTuljabhavaniTemple हा हॅशटॅग वापरून तुमचा आवाज पोहोचवा. अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आहे?

माझा विकासाला कधीच विरोध नाही. मात्र ऐतिहासिक संदर्भ असलेले दगड म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना पाहिलं आहे, ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना पाहिलं. त्या दगडांना हलवणारे हे कोण लागून गेले? ज्या दरवाजांतून शिवाजी महाराज आले, ज्या पायऱ्यांवरु ते खाली उतरले, वरती आले त्या पायऱ्या तोडून टाकायच्या? उद्या म्हणतील रायगड तोडा, तिथे नवा रायगड उभारा नाही चालणार असं, कारण आमची श्रद्धा आहे तिथे. तुम्ही काहीही करा. पण देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. गाभाऱ्याला ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ आहे. मंदिरातल्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. बाहेरुन जे काही सुशोभीकरण करायचं ते करा. मात्र गाभाऱ्याला हात लावू देणार नाही. ही माझी भूमिका आहे असं आव्हाड म्हणाले.

भाजपा कार्यकर्त्यांनी काय म्हटलं आहे?

जितेंद्र आव्हाड फक्त प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत. प्रभू रामचंद्र मांसाहारी होते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसंच सनातन हिंदू धर्मावर त्यांनी टीका केली आहे. आतापर्यंत सनातन धर्म नाही, नीच दर्जा आहे वगैरे आहे असं म्हणाले आहेत. आज ते म्हणत आहेत मी हिंदू आहे हे सांगायची वेळ आव्हाडांवर का आली ? त्या नास्तिक माणसाला काहीही कळवळा नाही. फक्त प्रसिद्धीचा स्टंट आहे. आव्हाड राजकीय षडयंत्र करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बसून तुळजा भवानीची तलवार चोरीला केली असं बेताल वक्तव्य केलं. काहीही आरोप कुठलीही माहिती न घेता ते करत आहेत. मंदिर उद्ध्वस्त करणार आहे असं आव्हाड म्हणत आहेत ही त्यांची पोटदुखी आहे. आम्ही त्यांचा जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करतो. जितेंद्र आव्हाड यांनी आधी ते आस्तिक आहेत की नास्तिक हे सांगावं. तुळजाभवानीचं मंदिर मुघल उद्ध्वस्त करु शकले नाहीत तर तुम्ही आम्ही कोण? आव्हाड सगळं काही प्रसिद्धीसाठी करत आहेत. असं भाजपा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार असो म्हणत घोषणाबाजी केली.