Jitendra Awhad : शनिवार ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्याला जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शेण व बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“उद्धव ठाकरेंच्या गाडी प्राणघातक हल्ला झाला आहे. तेव्हाचे हे या तीन व्हिडिओ बघून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या कोणत्या मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जाते”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

हेही वाचा – ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकत म्हणाले…

“…तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात येईल”

“ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतुक केले जाते, त्यांच्यावर आता नामुष्की ओढावते आहे, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही. विरोधी पक्षातील नेत्यांचा जीव जर धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात येईल”, असेही ते म्हणाले.

“फक्त एवढेच लक्षात ठेवा की…”

“तुम्ही काहीही बोललात, कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही”, अशा इशारही त्यांनी दिला.

हेही वाचा – “मलाही एक चित्रपट काढायचाय”, ठाण्यातून संजय राऊतांची घोषणा? नावही जाहीर केलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या होत्या सुपाऱ्या

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड येथील एका कार्यक्रमाला जात असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्याचा बदला म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण फेकल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.