Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला होता. पण अखेर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या विजयावर किंवा भाजपाच्या पराभवावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी यावर आपलं मत व्यक्त करताना भाजपावर हल्लाबोल केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ही ४ राज्ये भाजपाने खोक्यांचा वापर करून, तसेच केंद्रीय यत्रणांच्या दहशतीचा वापर करून पाडली. परंतु कर्नाटकच्या विजयाने सिद्ध झालं आहे की, लोकांना सुडाचं राजकरण आवडत नाही. त्यामुळेच कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपाच्या “खरेदी विक्रीच्या” धोरणाला मूठमाती दिली, हाच या विजयाचा अन्वयार्थ आहे.
आव्हाडांनी पुढे लिहिलं आहे की, आज सामान्य जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. परंतु यावर काहीच न बोलता, द्वेष आणि फक्त द्वेष पसरवण्याचं काम सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. पैशाचा, खोक्यांचा वारेमाप वापर करून, प्रसंगी केंद्रीय यत्रणांना हाताशी धरून सत्तेचा जो माज सत्ताधारी गटाला चढला होता, तो माज मात्र सामान्य जनतेच्या नजरेत खुपत होता. लोकांनी त्यांचा हा राग मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला.
हे ही वाचा >> “दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यावर…”, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
आव्हाडांनी त्याच्या ट्वीटच्या शेवटी एका हिंदी कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत, इतिहास ये दोहराता है की, नफरत के आगे हमेशा प्यार ही जीतता है… तुम नफरत फैलाव, हम प्यार ही बाटेंगे..! (द्वेषावर प्रेमाचा विजय होतो, इतिहास याची पुनरावृत्ती करतो, तुम्ही द्वेष पसरवा, आम्ही प्रेम वाटू,)