ग्रा.पं. निवडणूक जिंकणाऱ्या डॉ. कल्याण कुमार यांचा प्रवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : वडील बिहारचे तर आई उत्तर प्रदेशची, जन्म झारखंड राज्यातील जमशेटपूरचा, शिक्षण मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली व महाराष्ट्र या चार प्रमुख राज्यांसह थेट अमेरिकेत. पण, सेवाकार्याची भावना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ‘त्यांनी’  दिल्लीतील त्रिमूर्ती भवनातील सहायक प्राध्यापकाची नोकरी सोडून विदर्भातील मूल तालुक्यातील चितेगावची कार्यक्षेत्र म्हणून निवड केली. आज याच चितेगावात ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून नुकतेच निवडून आले आहेत. डॉ. कल्याण कुमार त्यांचे नाव. गाव खऱ्या अर्थाने समृद्ध व्हावे, यासाठी डॉ. कल्याण कुमार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपासून आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली आहे.

श्रमिक एल्गार प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले डॉ. कल्याण कुमार यांची नाळ मागील  बारा वर्षांपासून मूल तालुक्यातील चितेगाव या छोटय़ा खेडेगावाशी जुळली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. कल्याण कुमार विजयी झाले. मात्र त्यांच्या इथवरच्या प्रवासाची कथा मोठी रंजक आहे.  मूळचे बिहारचे असलेले डॉ. कल्याण कुमार यांचे वडील केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या आयुध निर्माणी कारखान्यात डॉक्टर होते.  या काळात त्यांनी भद्रावती येथे पहिली व दुसऱ्या वर्गापर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मध्यप्रदेशातील जबलपूर, इटारसी, कटनी, ग्वालियर येथे  १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पाटणा येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्याच दरम्यान दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे लेबर हिस्ट्री या विषयात पी.एचडी. पूर्ण केली. त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. तिथे त्यांची भेट श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्यासोबत झाली. हीच भेट त्यांना चंद्रपुरात आणि चितेगाव येथे घेऊन आली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कालांतराने दोघांनी विवाह केला. डॉ. कल्याणकुमार सांगतात,  चितेगाव येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. या गावातून सर्व सदस्य बिनविरोध निवडून यावेत अशी माझ्यासह ग्रामस्थांची इच्छा होती. त्यासाठी ग्रामसभेच्या दोन बैठकाही झाल्या. परंतु शेवटी निवडणूक झाली. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत आमचे सहा सदस्य निवडून आले. आता आम्हाला गावाचा विकास साधायचा आहे. शासकीय निधी गावाकडे कसा वळवता येईल याकडे लक्ष द्यावे लागेल.  एल्गार प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध संस्था, देशविदेशातील यंत्रणांशी संबंध आहे. सीएसआरच्या माध्यमातून खासगी संस्थांचा निधी गावाच्या विकासाकडे आणण्यास प्राधान्य राहील. देशविदेशातील संस्थांचा एखाद्या खासगी संस्थेला निधी देतात, तसे गावासाठी देखील निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. कल्याणकुमार यांनी सांगितले.  लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणूकी ऐवजी मुद्दाम ग्रामपंचायतीची निवड केल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, डॉ. कल्याणकुमार आजही पत्नी अ‍ॅड. गोस्वामी हिला तिच्या सामाजिक कार्यात मदत करतात. याच सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनी ही निवडणूक एकहाती जिंकली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey of dr kalyan kumar who won gram panchayat election zws
First published on: 21-01-2021 at 00:18 IST