k chandrashekhar rao announced to give 10 lakh to every Dalit family after BRS come in power spb 94 | Loksatta

“बीआरएस सत्तेत आल्यास प्रत्येक दलित कुटुंबाला दरवर्षी १० लाख रुपये देणार”; नांदेडमध्ये केसीआर यांची मोठी घोषणा!

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.

kcr announcement for Dalit family, kcr in nanded
फोटो एएनआय वृत्तसंस्था

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू असून त्यांनी आज नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली असून देशात बीआरएसचं सरकार आल्यास प्रत्येक दलित कुटुंबाला दरवर्षी १० लाख रुपये दिल्या जाईल, असं ते म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी आत्महत्यावरून राज्य तसेच केंद्र सरकार जोरदार टीकाही केली.

हेही वाचा – कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? अजित पवारांनी थेट उत्तर देत विषय संपवला; म्हणाले “त्यांनी डोक्यातून…”

नेमकं काय म्हणाले केसीआर?

“देशात आज परिवर्तनाची आवश्यता आहे. देशाला आज स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली आहेत. यादरम्यान देशात अनेकदा सरकारे बदलली. अनेक नेते, आमदार खासदार बदलले. अनेकांनी मोठी आश्वासने दिली. मात्र, आज देशात पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी नाही, गरिबांना आज वीजदेखील मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेऊन एकत्र लढा दिला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया के.चंद्रशेखर राव यांनी दिली.

“सर्वांनी एकत्र येऊन लढावे”

“आज ४२ टक्के शेतकरी आपल्या देशात आहेत. त्यात आणखी शेतमजुरांची संख्या जोडली, तर ही आकडेवारी ५० टक्क्यांच्यावर जाते आणि सरकार बनवण्यासाठी एवढी संख्या पुरेशी आहे. फक्त आपल्याला जाती धर्माच्या आधारे न लढता, एकत्र येऊन काम करावे लागेल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरली, विजयासाठी राबवणार गुजरात, उत्तर प्रदेशचे खास मॉडेल!

“…तरच देशाची प्रगती होईल”

देशातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला तरच देशाची प्रगती होईल. आज आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर महिला सबळीकरण करणं गरजेचं आहे. जर देशात बीआरएसचं सरकार आलं तर प्रत्येक क्षेत्रात महिलांना प्रतिनिधित्व देण्यात येईल. संसदेत १ वर्षात ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवला जाईल, असं ते म्हणाले. तसेच ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ नारा देण्यात आला. मात्र, महिलांबरोबर जे घडत आहे, हे पाहून शरमेने मान खाली जाते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रत्येक दलित कुटुंबाला १० लाख

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली. “बीआरएस सरकार आल्यास देशातील २४ लाख दलित कुटुंबांना दरवर्ष प्रत्येकी १० लाख रुपये दिले जाईल”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”

शेतकरी आत्महत्यावरून टीकास्त्र

“आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याचं कारण काय? जेव्हा सर्व रस्ते बंद असतात, तेव्हाच माणूस आत्महत्या करतो. देशाला अन्न देणारा अन्नदाता आज आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाला आहे. यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट नाही. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, तर राजकीय नेते विधानसभेत आणि संसदेत भाषण देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ‘अबकी बार किसान सरकार’, अशा नारा बीआरएस पार्टीने दिला आहे”, असेही म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 19:48 IST
Next Story
सोलापूर : मुलीला घटस्फोट दिल्याने हवालदार सासऱ्याने केला जावयाचा खून