लोकसत्ता टीम

चंद्रपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधींऐवजी ‘स्टार प्रचारक’ प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आग्रह धरल्यानंतरही त्यांची सभा मिळत नसल्याने तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सभा अखेरच्या क्षणी रद्द झाल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरसभा घेतली. या सभेतील गर्दीने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याही सभा झाल्या. मात्र, काँग्रेसची एकही मोठी सभा झालेली नाही. काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी ‘स्टार प्रचारक’ प्रियंका गांधी यांची १५ एप्रिल रोजी सभा आयोजित करावी, अशी आग्रही विनंती केली होती.

आणखी वाचा-“अण्णा बोलता हैं…”; सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टीच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मात्र, अद्यापपर्यंत प्रियंका गांधींची ही सभा निश्चित झाली नाही. प्रियंका गांधी यांनी सभेसाठी १६ तारीख दिली होती. मात्र, तीही निश्चित नाही, अशी माहिती धोटे यांनी दिली. विशेष म्हणजे, खासदार राहुल गांधी यांच्या ऐवजी काँग्रेस नेत्यांनी प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी आग्रह धरला होता. मात्र, ही सभा निश्चित झाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सभा बल्लारपूर, चंद्रपूर व घुग्घुस या तेलगू भाषिक पट्ट्यात आयोजित करण्यात आली होती. तीही रद्द झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रचाराची रणधुमाळी संपायला केवळ चार दिवसांचा अवधी आहे. यामुळे प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या इतर ‘स्टार प्रचारकां’च्या सभा येथे होणार नाहीत, असेच काहीचे चित्र आहे.