काही महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कालीचरण महाराज या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्याला कारण होतं कालीचरण महाराजनं महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील धर्मसंसदेमध्ये कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर कालीचरणला छत्तीसगड पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा एकदा कालीचरणने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विधान केलं आहे. तसेच, धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घेऊन हिंसक व्हायला हवं, असं गंभीर आव्हान देखील त्याने केलं आहे. कालीचरण महाराज ठाण्यात असताना टीव्ही ९ शी बोलताना त्याने हे विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा हा छत्रपतींचा आदर्श”

राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिल्याचं कालीचरण महाराज यावेळी म्हणाला. “राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करणे हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे. आपण राष्ट्ररक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र उचललं पाहिजे. म्हणून गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण यांचे आदर्श धारण केले पाहिजेत. राष्ट्ररक्षणसााठी आपण हिंसक बनायला हवं. जशी आपली सेना आहे. याशिवाय उपाय नाही”, असं विधान कालीचरणने केलं आहे.

“…तर नालंदा विद्यालय तुटलं नसतं”

“शस्त्रामुळे ज्या राष्ट्राचं रक्षण होतं, तिथेच शास्त्रचर्चा होऊ शकते. मुसलमानांनी नालंदा तक्षशिला विश्वविद्यालय मुसलमानांनी यासाठीच तोडलं की तिथे शस्त्राची आराधना नव्हती, फक्त शास्त्राची होती. त्या विद्यालयाचं संरक्षण शस्त्र करत असते, तर ते तुटलं नसतं आणि भारत जगतगुरू असता”, असं देखील कालीचरण म्हणाला आहे.

राज ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, अयोध्येमध्ये राज ठाकरेंच्या भेटीला विरोध होत असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. “पूर्वीच्या भाषावादामुळे हिंदुंची मनं दुखलेली आहेत. आपण जेव्हा मराठीची गोष्ट करतो, तेव्हा आपल्यापासून गुजराती, मारवाडी, बंगाली, हिंदी, उडिया, तमिळ, तेलगु तुटतील. हे सगळे हिंदू आहेत”, असं कालीचरण म्हणाला.

“शिवाजी महाराजांचा अजेंडा मराठी साम्राज्य स्थापनेचा नसून हिंदूंचं साम्राज्य स्थापन करण्याचा होता. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी ती धर्मध्वजा हातात घेऊ, तेव्हा आपल्या डोक्यात भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, वर्णवाद राहणार नाही. आपल्या डोक्यात फक्त धर्म राहील. राजकारणात परिपूर्ण हिंदुत्व घुसलंच पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात राजनीतीचं हिंदुकरण आणि हिंदुंचं सैनिकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच मार्गाने सगळे हिंदू जात आहेत”, असं देखील विधान कालीचरणने केलं आहे.

लोकसत्ता विश्लेषण: कालीचरण महाराज वाद नेमका आहे तरी काय? अटक होईपर्यंत असं काय घडलंय? जाणून घ्या

महात्मा गांधींबद्दल काय केलं होतं विधान?

रायपूरमधील धर्मसंसदेमध्ये बोलताना कालीचरणनं महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारले होते. यावेळी त्याने गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केलं.

कालीचरण महाराज या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला. यानंतर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याला अटक झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalicharan maharaj controversial statement on mahatma gandhi shivaji maharaj pmw
First published on: 13-05-2022 at 13:08 IST