शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दरम्यान, कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचं म्हटलं आहे. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनानं पालिकेवर आणि सरकारवर निशाणा साधला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका,” असं कंगना म्हणाली. तिनं ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

“उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र,” असं कंगना बुधवारी मुंबई आल्यानंतर म्हणाली होती.

पालिकेकडून कारवाई

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut criticize shiv sena bmc it is now sonia sena balasaheb thackeray sanjay raut pok mumbai statement jud
First published on: 10-09-2020 at 09:45 IST