सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
कणकवली शहरात अवैध धंदे सर्रास सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी अचानक घेवारी यांच्या मटका जुगार बुकी अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह ही कारवाई केली. विशेष म्हणजे, याआधी पोलीस केवळ टपरीधारक किंवा मटका खेळणाऱ्यांवर कारवाई करत असत, पण राणे यांनी थेट बुकीवरच छापा टाकत कठोर पाऊल उचलले. या घटनेनंतर त्यांनी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना घटनास्थळी बोलावले आणि मागील ९ महीन्यात कारवाई केली नसल्याने हे पाऊल उचलले आहे असे स्पष्ट केले होते.
राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अवैध धंद्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. जे अधिकारी अशा धंद्यांना संरक्षण देतील, त्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, तीन पत्ती, अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री यांसारख्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता पोलिसांनीही अवैध धंद्यांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे, मात्र धंदेवालेही सतर्क झाले आहेत. या कारवाईमुळे अवैध धंद्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.