कराड : विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरील तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पेरले, ता. कराड येथे ७७ वर्षीय शेतकरी संभाजी बाबुराव सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २२) सायंकाळी उशिरा उघडकीस आली. उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर जर्नादन सूर्यवंशी (रा. पेरले) यांनी या घटनेची खबर पोलिसात दिली आहे.

संभाजी सूर्यवंशी घराजवळील रानात पशुधनास वैरण चारा आणण्यासाठी गेले होते. ते सायंकाळपर्यंत परत आले नाहीत, म्हणून त्यांची मुलगी त्यांना पाहण्यासाठी गेली असता पेरले येथील बिरोबा वस्ती मळा येथे उसाच्या शेतात संभाजी सूर्यवंशी यांना विजेच्या खांबावरील तुटलेल्या वीज वाहिन्यांचा धक्का लागून पडून असल्याचे निदर्शनास आले. सूर्यवंशी यांना तातडीने उंब्रज सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी त्यांचे निधन झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.