कराड : येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. यू. एल. जोशी व दिलीप पतंगे यांच्या नेतृत्वाखालील लोकन्यायालयाला चांगला प्रतिसाद मिळाला. अपघात प्राधिकरण, धनादेश अनादरन, तडजोडपात्र खटले, दावे लोकन्यायालयात मांडले गेले. तरी, या लोकन्यायालयात ६९६ खटले सामंजस्याने मिटले असून, ६ कोटी १८ लाख रुपयांच्या तडजोडीतून दावे यशस्वीरित्या निकली निघाले आहेत.
कराडमध्ये लोकन्यायालयात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. तोडकर, एस. डी. कुरेकर, पी. एल. घुले, के. आर. खोंद्रे, श्रीमती जे. जे. माने, दिवाणी न्यायाधीश एस. एम. बोमिडवार, श्रीमती पी. एस. भोसले, श्रीमती ए. वी. मोहिते, पी. पी. कुलकर्णी आणि अतुल ए. उत्पात हे विधी अधिकारी पॅनल प्रमुख म्हणून कार्यरत होते. कराड वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. दीपक थोरात, संघटनेचे पदाधिकारी आणि वकिलांनी लोकन्यायालय यशस्वी होण्याकरता विशेष प्रयत्न केले.
लोकांमधील तंटे सामंजस्याने मिटावेत, सर्वांनाच न्याय झाला अशी भावना व्हावी, न्यायालयीन खर्च आणि वाद संपुष्टात यावा या उद्देशाने आयोजित या लोकन्यायालयात तब्बल ६ कोटी १८ लाख रुपयांच्या तडजोडीच्या रकमांसह काही भावनिक नातीही पुन्हा एकत्र आली. एकमेकांवर असणारा द्वेष व राग याचे क्षणात प्रेमात रूपांतर झाले. झाले गेले पाठीवर टाकून यापुढे गुण्यागोविंदाने राहण्याचा विश्वास देत यापुढे न्यायालयाची पायरी चढायची नाही, असा ठाम निर्धार या वेळी काही जणांनी केला.
लोकन्यायालयात ३,३१० खटले
कराड न्यायालयात सद्य:स्थितीत एकूण १८ हजार ६१० खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी तीन हजार तीनशे दहा खटले लोकन्यायालयात ठेवण्यात आले. त्यापैकी ४९६ खटले सामंजस्यांने मिटले, तर वादपूर्व निकाली जवळपास दोनशे खटले न्यायालयात येण्यापूर्वीच मिटवले गेले. त्यामुळे कराड न्यायालयातील एकूण ६९६ खटले या लोकन्यायालयात सामंजस्याने मिटले आहेत.
रक्ताचे ऋणानुबंधही जुळले
चार वर्षांपासून एकमेकांचे तोंडही न पाहणारे बाप-लेक लोकन्यायालयाच्या निमित्ताने एकत्र आले, दोघांतील कटुता संपवून त्यांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली. मुलाने चूक मान्य करून वडिलांचे पाय धरले तर, वडिलांनीही माझे चुकले असे सांगून, मुलाची समजूत काढली. हे मनोमिलन पाहून न्यायालयही स्तब्ध झाले होते.