कराड : घरगुती गॅस सिलिंडरचा वापर प्रवाशी रिक्षांसाठी इंधन म्हणून होत असल्याच्या तक्रारीवरून कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कराड, बनवडी, मलकापूर आदी ठिकाणी छापे टाकून मागील दोन वर्षात ७६ सिलिंडरच्या टाक्या जप्त केल्याची माहिती कराड तहसीलदार कचेरीतील पुरवठा अधिकारी साहिला नायकवडे यांनी पत्रकारांना दिली.

साहिला नायकवडे म्हणाल्या, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध साठा करणे व प्रवाशी रिक्षात घरगुती गॅस भरणे या प्रकरणी ११ जणांविरुध्द कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगाशिवनगर येथील पूजा मार्केट पाठीमागे छापा टाकून तिघांकडून तब्बल २५ सिलिंडच्या टाक्या जप्त करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. ढेबेवाडी फाटा- मलकापूर येथे छापा टाकून दोन टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.

विश्रामनगर- मलकापूर येथील कारवाईत नऊ टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. बागलवस्ती- आगाशिवनगर येथील कारवाईत दोन टाक्या आणि कराड शहरातील मंगळवार पेठ, पालकर वाडा येथील कारवाईत सहा टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. मालकापूर – आगशिवनगर येथील सरिता बझार समोर करण्यात आलेल्या कारवाईत दोन टाक्या आणि सैदापूर- कराड येथील कारवाई दोन टाक्या तसेच कराडच्या शिवाजी स्टेडीयम मागील बाजूस कारवाई करून तीन टाक्या, बनवडी फाटा येथील कारवाईत तब्बल २५ टाक्या छापे टाकून जप्त करण्यात आल्या आहेत.

कराड, बनवडी, मलकापूर येथील या छाप्यांमध्ये एकूण ७६ सिलिंडरच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर, ११ जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कराड तहसीलदार कचेरीतील पुरवठा विभागाकडून सतत तपासणी सत्र सुरू असून, रिक्षात इंधन म्हणून घरगुती सिलिंडर गॅस भरणे, घरगुती सिलिंडरचा अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या सिलिंडर टाक्या कोणत्या गॅस सिलिंडर वितरण कंपनीच्या आहेत.

सिलिंडर टाक्यांचा साठा करणाऱ्यांकडे त्या कशा आल्या याचीही चौकशी कसूरन होत असल्याचे कराड तहसीलदार कचेरीतील शासकीय पुरवठा अधिकारी साहिला नायकवडे यांनी या वेळी सांगितले. या धडक कारवाईमुळे अवैधरित्या रिक्षात इंधन म्हणून घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस भरणारे व असा गॅस आपल्या रिक्षात भरून घेणारे यांचे धाबे दणाणले आहेत. आता महसूल विभागाच्या या धडक कारवाईत सातत्य किती राहते आणि किती निष्पक्षपणे कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.