कराड : महायुती सरकारने राज्यातील उपसा जलसिंचन सहकारी योजनांच्या वीजदेयकात दिलेल्या सवलतीमुळे या उपसा जलसिंचन सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल राज्याचे पर्यटनमंत्री तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मांडला असता, तो एकमताने मंजूर करण्यात आला.

दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मंत्री शंभूराज देसाई यांनी दूरसंवाद प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) सभासद , शेतकरी व संचालक मंडळाशी संवाद साधला. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष संजय देशमुख, डॉ. दिलीप चव्हाण, अशोक पाटील, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. डी. पी. जाधव, ॲड. बाबुराव नांगरे यांच्यासह संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसमोरील विषय आणि अहवाल वाचन वैभव जाधव यांनी केले.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, साखर दरातील घसरण, उत्पादनातील घट आणि बाजारातील मंदी यामुळे कारखानदारीपुढे कडवे आव्हान आहे. मात्र, हा प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून तातडीने तोडगा काढण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तसेच राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर असलेला तब्बल दहा हजार कोटींचा प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नातून माफ करण्यात आल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

कारखान्याचे अध्यक्ष यशराज शंभूराज देसाई यांनी कारखान्याच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेताना कारखान्याची गाळप क्षमता अशी दुप्पट करण्यात आली हे सांगितले. कारखान्यात खर्च आणि वेळेची बचत झाली आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादनवाढीसाठी विशेष आणि कटाक्षाने प्रयत्न होणार आहेत. सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधे पुरवठा लवकर करण्याची हमीही दिली जाईल, अशी ग्वाही यशराज देसाई यांनी या वेळी बोलताना दिली. कार्यक्रमात बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे सेवेतून निवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच ऊसपीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे यांनी उपस्थित सभासद, संचालक व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या सभेत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना, कारखान्याच्या कामकाजाचे समर्थन केले. गुणगौरव केला आणि कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रशासन तसेच कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.