कराड : अवकाळी पावसामुळे सर्वत्र पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, तसेच दुसऱ्या ऊस देयकापोटी प्रतिटन पाचशे रुपये त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
अवकाळी पावसामुळे ऊस, टोमॅटो, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या घरांची व विहिरींचीही पडझड झाली. शेती मशागतींची कामेही खंडित झाली झाल्याने शेतकऱ्यांना दुबार मशागत करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामे करून, संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.
याशिवाय, सध्या साखरेला प्रति क्विंटल चार हजार रुपये दर असून, उसापासूनच्या इथेनॉल व इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे दुसरे देयक अदा करणे सहज शक्य असल्याची भूमिका संघटनेने निवेदनात मांडली आहे.
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात अद्यापही कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही. या मागण्यांकडे सरकार व प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास येत्या १० जूनला कराड तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बळीराजा संघटनेने दिला आहे. निवेदनावर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वास जाधव, चंद्रकांत यादव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.