कराड : आधुनिक ट्रॅक, इनडोअर व आउटडोअर खेळांसाठी कोर्ट, प्रेक्षकांसाठी उत्तम आसनव्यवस्था, खेळाडूंसाठी वसतिगृह, फिटनेस अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी शिवाजी क्रीडांगण साकारले जाणार असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. हा प्रकल्प क्रीडा क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कराडमध्ये ९६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, सुहास जगताप तसेच खेळाडू, प्रशिक्षक, नागरिक उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, ‘मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमच्या धर्तीवर कराडमध्ये स्टेडिअम उभारावे, जेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयपीएल, रणजी, टी-२०, वन डे, कसोटी सामने घेता येतील, अशी मागणी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जयवंतराव भोसले जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनावेळी केली होती. त्या मागणीला त्यांनी प्रतिसाद देत महायुती सरकारच्या माध्यमातून मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्चाधिकार समितीकडूनही मान्यता मिळाली होती. सुरुवातीला निधीवरून अडचणी आल्या. मात्र, उच्चाधिकार समितीच्या सूचना बदलून अखेर फडणवीस यांनी ९६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवकांमधील क्रीडा कौशल्यास योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्यात मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या भव्य क्रीडासंकुलाची संकल्पना साकारत आहोत. येथे विविध खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणार असून, स्थानिक खेळाडूंना संधी मिळून त्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास आमदार डॉ. भोसले यांनी दिला. प्रकल्प क्रीडा क्षेत्रासाठी नवसंजीवनी ठरेल, असे प्रतिपादन अनेकांनी कार्यक्रमात केले.