कराड : शहरातील कोयना नदीवरील जुना व नवीन पूल, तसेच कोयनेश्वर मंदिर व प्रीतिसंगम परिसरात अनेकदा लोकांना मगरीचे दर्शन घडले आहे. सोमवारी येथील कृष्णा– कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर पुन्हा मगरीचे दर्शन झाल्याने या मगरीची दहशत कायम राहिली आहे.
येथील प्रीतिसंगम परिसरात कोयना नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील नदीकाठावर सोमवारी मगरीचे दर्शन झाले. सकाळी प्राणिमित्र सुरेश पवार यांनी ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या चित्रीकरणामध्ये ही मगर नदीच्या पाण्यात तरंगत विश्रांती घेत असल्याचे स्पष्ट दृश्य टिपले गेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील जुना व नवीन पूल, तसेच कोयनेश्वर मंदिर आणि प्रीतिसंगम बाग परिसरात वारंवार मगरीच्या होणाऱ्या दर्शनाने नदीत पोहायला येणाऱ्या नागरिकांसह मासेमारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रीतिसंगमाकडे दररोज शेकडो पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात. मात्र, नदीत मगरीचे वास्तव्य स्पष्टपणे आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या मगरीला पकडून अन्यत्र सुरक्षितपणे सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, मगरीचा धोका लक्षात घेता नागरिकांनी नदीत उतरणे, पोहणे, मासेमारी करणे टाळावे, तसेच वन विभाग आणि पालिका प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, तसे सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
दरम्यान, कृष्णा- कोयना नद्यांमध्ये अलीकडे मगर आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी कराड लागत वारुंजी, कृष्णा- कोयना नद्यांचा प्रीतीसंगम, नवीन व जुना कोयना पूल यासह कार्वे, रेठरे पुलाखाली व परिसरात मगरींचे दर्शन घडले आहे. यावर वनखात्याने त्याची दाखल घेवून योग्य त्या उपाययोजना करताना, लोकांना काय खबरदारी घ्यायच्या याचे प्रबोधनही केले आहे. तसे आवाहन केले आहे.
अभ्यासकांच्या मते कृष्णा- कोयना नद्यां हे मगरीचे अधिवास क्षेत्र आहे. खरेतर, त्यांचा अधिवास लोकांना भीतीचा वाटू नये. कारण मगरींनी त्यांचा अधिवास परिसर सोडून जायचे कुठे असा प्रश्न आहे. मगरींचे दर्शन झाल्याचे त्याची माहिती संबंधित वन विभागाला देण्यासह कमालीची दक्षता गरजेचे असते. परंतु, मगरी दिसली कि त्यांची विनाकारण भीतीदायक चर्चा होते. परंतु, अशावेळी वन विभागांच्या सूचनांचे पालन हेच अतिशय महत्वाचे आहे. तसे मार्गदर्शन व आवाहन वेळोवेळी वन विभाग करीत असते.