कराड : राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव काळात देखावे सादर करण्यासाठी शेवटच्या पाच दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची मुदत राहणार असल्याचे शिवसेना नेते व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर हा निर्णय झाला असून, याबाबतचे लेखी आदेश प्रशासनाला लवकरच मिळतील, असे शंभूराजेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कराड दौऱ्यात दोन दिवसांपूर्वी विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या होत्या. त्यात गणेशोत्सवात देखावे सादर करण्यासाठी शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत मुदत देण्याची आग्रही मागणी गणभक्तांनी केली होती. स्थानिक शिवसेना नेते व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या पुढाकाराने हा विषय मांडण्यात आला होता. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हीच मुदत देण्यात आली होती; मात्र यावर्षी अद्याप आदेश निघाले नसल्यामुळे मंडळांमध्ये संभ्रम होता.
ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ संमती दिली. त्यामुळे मंडळांचा मोठा पेच सोडविला गेला असून, गणेशोत्सवातील देखावे अधिक आकर्षक आणि वेळेवर सादर करण्यास यामुळे मदत होणार आहे.
पालकमंत्री देसाई यांच्या घोषणेनंतर शहरातील गणेश मंडळांनी समाधान व्यक्त केले आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करून आभार मानले.
हिंदकेसरी संतोष वेताळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, रणजित पाटील, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, राहुल खराडे, विनोद भोसले, ओमकार मुळे, चांदणी मुळे, गणेश कापसे, अक्षय पवार, जय सूर्यवंशी, महेश जाधव, प्रसाद कुलकर्णी, किशोर मोहिते आदींसह मोठ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव म्हणाले, कराड शहरातील गणेश मंडळांनी केलेल्या मागण्यांना तातडीने प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंडळांना दिलासा दिला. यामुळे फक्त कराडच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील गणेश मंडळांची मागणी पूर्ण झाली आहे. या निर्णयातून पालकमंत्र्यांच्या धडाडीची प्रचिती आली असून, सर्व गणेश मंडळांतर्फे मी मंत्री शंभूराजेंचे आभार मानत आहे.