कराड : शहरातील मुख्य रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना लावलेले राजकीय व व्यावसायिक फलक, जाहिरातफलक, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे उभे फलक (स्टँड बोर्ड) यांच्यावर कराड नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. विनापरवाना जाहिरात फलक लावल्यास सक्त कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या सूचनेनुसार, आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी वरिष्ठ मुक्काम प्रमोद कांबळे व त्यांच्या पथकाच्या मदतीने शहरात विशेष मोहीम राबवून बेकायदा फलक हटवले. या मोहिमेंतर्गत कोल्हापूर नाका, शाहू चौक, दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, बस स्थानक परिसर, विजय दिवस चौक, शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसर, कृष्णा नाका, पांढरीचा मारुती मंदिर, कन्याशाळा, नगरपालिका परिसर या प्रमुख ठिकाणी कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहिमेदरम्यान, विद्युत खांबांवर लावलेले फलकही हटवण्यात आले. तसेच काही मोठ्या फलकधारकांना त्वरित फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधितांनी हे फलक तातडीने न काढल्यास त्यांच्यावर थेट जप्तीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात कोणतीही जाहिरात किंवा फलक लावण्यापूर्वी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई व फलक जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.