कराड : कराड तालुक्यातील कापिल व गोळेश्वर येथील कथित बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून कराडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरसुद्धा कारवाई व्हावी, या मागणीसाठी गोळेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश पवार यांनी गुरुवारपासून (दि. १४) कराड तहसील कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास विविध पक्ष, संघटना आणि ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे.

बोगस मतदानाविरोधात गणेश पवार यांनी आरोप केला आहे की, कापिल गावातील मतदारयादीत नऊ अशी नावे समाविष्ट आहेत, की जे या गावचे रहिवासी नाहीत. त्यांच्या नावे कापिलमध्ये घर, जमीन नसतानाही विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केले आहे. या व्यक्तींनी यापूर्वी ग्रामपंचायत, लोकसभा किंवा अन्य कोणत्याही निवडणुकीत मतदान केलेले नसल्याचा पवार यांचा आरोप आहे.

पवार यांच्या म्हणण्यानुसार, अचानक या नावांचा समावेश मतदारयादीत कसा झाला, तसेच कापिल व गोळेश्वर या दोन्ही गावांच्या मतदारयादीत काही व्यक्तींची नावे दुबार असून, गोळेश्वरमध्ये तब्बल ७५ मतदार संशयास्पद आहेत. या सर्वांची चौकशी करून संबंधित बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे.

विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वीच या नावांचा समावेश मतदारयादीत करण्यात आला असून, यापूर्वी त्यांच्या नावांची वगळणी जुन्या मतदारयादीतून झालेली नव्हती. त्यामुळे ही भर घालणे हे गंभीर आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्या गणेश पवार यांची मागणी आहे.

दरम्यान, या आमरण उपोषणाला कापिल ग्रामस्थ, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच इतर राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पवार यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले हे उपोषण सुरू राहणार असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कराड तालुक्यातील कापिल व गोळेश्वर येथील कथित बोगस मतदानाच्या या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यावरून दोन्ही बाजुकडील राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.