MLA Rajendra Patni Passed Away : वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झाले. ५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार राजेंद्र पाटणी हे वाशीम जिल्ह्यातील भाजपचे एक अभ्यासू नेतृत्व होते. शिवसेनेकडून पाटणी यांनी विधान परिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य म्हणून काम केले होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाकडूनदेखील ते कारंजा-मानोरा मतदारसंघातूम निवडून आले होते.
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली व्यक्त केली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत राजेंद्र पाटणी यांच्या निधनाची माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळील विश्वासू म्हणून देखील ते परिचित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
पाटणी यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर विजय संपादन केला होता. त्यानंतर ‘मोदी लाटेत’ त्यांनी भाजपात प्रवेश करत वाशिम जिल्हाध्यक्षपदासह आमदारकी मिळवली. मागच्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी असल्यामुळे मतदारसंघात त्यांचे सुपूत्र ज्ञानक पाटणी यांचा वाढता सहभाग चर्चेचा विषय बनला आहे. अनेक विकास कामाचे भूमिपूजन देखील ज्ञानक पाटणी कडून होत असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजप चा चेहरा राहतील का ? यावरून चर्चेला उधाण आले आहे.
ज्ञानक पाटणी हे भाजप जैन प्रकोष्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले असून आरोग्य शिबिरे वा इतर उपक्रमात सहभागी होताना दिसतात. ज्ञानक पाटणी यांच्या हस्ते कारंजा व मानोरा तालुक्यात आमदार राजेंद्र पाटणी यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचे भूमिपुजन देखील करण्यात आलेले असून मागील वर्षभरापासून त्यांचा मतदार संघातील वाढता सहभाग चर्चेचा विषय बनला आहे.