कराड : कारगिल शौर्य दिनानिमित्त येथील विजय दिवस चौकातील विजय स्तंभावर पुष्पचक्र वाहून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. विजय दिवस समारोह समितीच्या वतीने २६ वा ‘कारगिल विजय दिवस’ अर्थात कारगिल शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या हस्ते विजय स्तंभावर पुष्पचक्र वाहून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. या वेळी उपस्थितांनी दिलेल्या ‘भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम्’ अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला.
राजू ताशिलदार यांनी पराक्रम व शौर्याबद्दल भारतीय सैन्य दलांचे अभिनंदन केले. कराड शहरात विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करून कराडच्या जनतेत, युवकांमध्ये भारतीय सैनिकांप्रति अभिमानाची भावना निर्माण केली जाते, असे कार्यक्रम घेतले जातात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे ताशिलदार म्हणाले.
प्रास्ताविकात विलास जाधव म्हणाले, की भारतीय जवानांच्या शौर्याचे व विजयाचे स्मरण करण्यासाठी कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी २६ जुलै ‘कारगिल विजय दिवस’ हा विजय स्तंभावर पुष्पचक्र वाहून मानवंदना देऊन साजरा केला जातो.
या प्रसंगी (नि.) सुभेदार प्रशांत कदम विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, चंद्रकांत जाधव, सलीम मुजावर, अरुण पवार, प्रा. बी. एस. खोत, प्राचार्य गणपत कणसे, रत्नाकर शानभाग, प्रा. जालिंदर काशीद, राजीव अपिने यांच्यासह विविध सेवाभावी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.