पुण्यातील कसबा प्रचारादरम्यान भाजपाने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात आज(शनिवार) ते सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर सपत्नीक उपोषणाला बसले आहेत. धंगेकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “राजकीय स्टंट आहे. सरळ हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही. हे माहीत असताना, अशाप्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते, त्यावेळी असे स्टंट केले जातात.”

याचबरोबर “खरं म्हणजे हे आचारसंहितेचं पूर्ण उल्लंघन आहे. पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवाची आहे. भाजपाची नाही आणि आमचा मतदारही असा नाही की पैसे घेऊन कुठे मतदान करेल. खरं म्हणजे एकप्रकारे मतदारांचा अवमान करण्याचं हे काम आहे. हे उपोषण भाजपाच्या विरोधात नाही, हे मतदारांच्या विरोधात आहे कारण तुम्ही मतदारांना विकावू ठरवत आहात, हे अतिशय चुकीचं आहे. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो.” असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – “मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही, जे विधान मी करतो…” देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर!

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली आहे. नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली असीम, ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता संपला.

हेही वाचा – “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जरी नामांतर झालं असलं, तरी…” उद्धव ठाकरेंना उद्देशून संजय शिरसाटाचं विधान!

रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. तसेच नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार संपल्यानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba byelection devendra fadnavis reaction on ravindra dhangekar allegation that bjp give mony to voters msr
First published on: 25-02-2023 at 14:17 IST