कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मोठा विजय मिळवला आहे. तब्बल १० हजाराहून जास्त मताधिक्याने त्यांनी ही निवडणूक जिंकली असून यात भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून महाविकास आघाडीकडून मात्र ही भाजपाच्या पराभवाची सुरुवात असल्याचा दावा केला जात आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधासभेतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना खोचक टोला लगावला आहे.

काय घडलंय कसब्यामध्ये?

कसबा विधानसभा पोटनिवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्यामुळे भाजपाविरोधात नाराजीचं वातावणर असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांचा १० हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे २८ वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर आता काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. हेमंत रासने यांनी यावर आत्मचिंतन करण्याची गरज बोलून दाखवली आहे.

कसबा निकालाचे पडसाद अधिवेशनात!

दरम्यान, कसब्यातील निकालांचे पडसाद थेट राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळालं. या निकालाची माहिती देणाऱ्या नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत टोला लगावला. “आताच कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ११ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या बसण्याची जागा आपल्याला निश्चित करावी लागेल”, असं नाना पटोले म्हणाले.

कसब्यात विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझं हिंदुत्व…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोलेंच्या या टोल्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी खोचक टिप्पणी केली. “मी नानाभाऊंचं अभिनंदन करतो. जो काही निकाल आहे तो स्वीकारला पाहिजे. तसाच चिंचवडचाही निकाल येणार आहे, तोही स्वीकारलाच पाहिजे. प्रश्न एवढाच आहे नानाभाऊ, जसं कसब्याचं आत्मचिंतन आम्ही करू, तसंच तुम्हालाही आत्मचिंतन करावं लागेल. तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस कुठे दिसतच नाहीये. आता तुमच्यावर ही स्थिती आली नानाभाऊ की एखादा विजय मिळाला तर तुम्हाला सभागृहात उभं राहून सांगावं लागतं. त्यामुळे थोडं आत्मचिंतन तुम्ही करा, थोडं आम्ही करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.