व्यवस्थेचा जाचक पगडा मिरविणारा समाज संस्कृतीच्या नावाखाली खोटय़ा प्रतिष्ठा जपत असतो. त्यातून माणसांचे अवमूल्यन होते, अशा व्यक्ती तटस्थपणे टिपून वाचकांच्या मनात त्याविषयी विचार करण्याची संवेदना जागे करणारे साहित्य चिरकाल टिकते. ‘कथा-व्यथा’ या कथासंग्रहात ती संवेदना आणि सहवेदना निश्चितच आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या सामान्य संघर्षांला अक्षरांच्या माध्यमातून एक जिवंतपणा आला असल्याचे प्रतिपादन साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने येथील लेखिका कमलताई नलावडे यांच्या ‘कथा-व्यथा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नम्रता ही माणसाला नेहमी पुढे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे. याचा प्रत्यय नलावडे यांचा कथासंग्रह वाचताना पावलोपावली येतो. यातील काही कथा या कथेच्या प्रारूप संकल्पनेत बसतील आणि काही बसणार नाहीत. मात्र तो एक सृजनात्मक अनुभव आहे. समीक्षक त्याला काहीही म्हणो; परंतु तो अस्सल अनुभव नलावडे यांनी प्रामाणिकपणे मांडला असल्याचेही फुलारी यांनी सांगितले. महिलांचे चित्रण त्यांच्या कथांमधून अधिक ठळकपणे समोर येते. कित्येक कथांमध्ये दीर्घकथा नव्हे, तर कादंबरीची बीजे आहेत. भविष्यात त्यांच्या हातून नक्की अशा साहित्यकृतीही आपणा सर्वाना अनुभवण्यास मिळतील, असा विश्वासही फुलारी यांनी व्यक्त केला. मागील दोन वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या साहित्य चळवळीची गती निश्चितच मराठवाडय़ाचे लक्ष वेधून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. अवतीभोवती असलेली सर्वसामान्य माणसे, त्यांचा सभोवताल, दैनंदिन जीवनात दिसणारा आपला परिसर शब्दांच्या माध्यमातून मांडला आहे. अनेक दिवसांपासून हा अक्षर अनुभवांचा साठा पुस्तकरुपाने सर्वासमोर ठेवण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण होत आहे. वाटय़ाला आलेले अनुभव अगदी तळमळीने, प्रामाणिकपणे या कथांच्या माध्यमातून शब्दबद्ध केले आहेत. या कथा निश्चितच आपणा सर्वाशी संवाद साधतील. आपणही मोकळेपणाने पुस्तकाशी बोला, असे आवाहन लेखिका कमलताई नलावडे यांनी केले. प्राचार्य डॉ. अनार साळुंके यांनी या कथासंग्रहामधील बलस्थाने श्रोत्यांसमोर मांडली. एकूण कथात्मक अनुभव व्यक्त करताना लेखिकेच्या व्यक्तीगत जीवनातील अनुभवांची त्यात झालेली बेमालूम सरमिसळ त्यांनी सर्वासमोर उलगडवून दाखविली. पत्रकार दयानंद माने यांनी विद्यार्थी दशेपासून कमलताई नलावडे यांच्याकडून ऐकलेल्या कथांचे संदर्भ देत हा कथासंग्रह त्याचे मूर्त रूप असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. राज कुलकर्णी यांनी व सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले.