भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळे आरोप केले होते, त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून किरीट सोमय्या प्रसिद्धीपासून थोडे लांब राहिले आहेत. मात्र, सोमय्या यांनी आता महायुती सरकारच्याच कारभारावर बोट ठेवलं आहे. सोमय्या म्हणाले, “गेल्या दोन वर्षात मी पाहिलं की या सरकारनेही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या सरकारमधील लोकांनीही घोटाळा करण्याचे प्रयत्न केले. कारण व्यक्ती तर त्याच आहेत ना… (मविआतील अनेक नेते आज महायुतीत आहेत.) तिथले लोकच तुम्ही इकडे घेतले आहेत. परंतु, मी दिल्लीत जाऊन ज्या लोकांना या घोटाळ्याबद्दल सांगायला हवं होतं त्यांना या याबाबत माहिती दिली. एक मंत्री पूर्वी घोटाळा करत होता, तो आधी एकटा करत होता, आता महायुतीच्या सरकारमध्येही त्याने तसा प्रयत्न केला. तसेच या घोटाळ्यात त्याने एका भाजपावाल्याला साथीदार करून घेतलं होतं.

किरीट सोमय्या म्हणाले, “त्यांनी घोटाळा करायचा प्रयत्न केला, मात्र मी दिल्लीत जाऊन त्याबद्दल सांगितलं. ज्या व्यक्तीला या घोटाळ्याची माहिती द्यायला हवी होती त्या व्यक्तीलाच मी सांगितलं. मी हे खपवून घेणार नाही असंही सांगितलं. शेवटी ती निविदा रद्द करण्यात आली. आधीच्या सरकारच्या काळात ३३ महिने जे काही चालू होतं, तेच पुढे चालू राहिलं असतं तर किरीट सोमय्या हिरो झाला असता. परंतु, या महाराष्ट्राची वाट लागली असती. महाराष्ट्राची वाट लागू नये म्हणून मी काही तडजोडी केल्या आहेत. काही करार झाले आहेत.” सोमय्या मुंबई तकशी बोलत होते.

हे ही वाचा >> विशाल पाटील सांगली लोकसभेत बंडखोरी करणार? विश्वजीत कदम म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी सोमय्या यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला ‘मातोश्री’वर (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे) राजकीय हल्लाबोल करण्यास कोणी सांगितलं होतं? त्यावर सोमय्या म्हणाले, मी भाजपाचा एक शिस्तबद्द कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाने मला ज्या ज्या वेळी मला जे काही सांगितलं ती प्रत्येक गोष्ट मी केली. ‘मातोश्री’चा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असो, अथवा हसन मुश्रीफांचा, त्यासाठी मी संशोधन केलं, माझी त्यासाठी वचनबद्धता होती, हाती पुरावे सापडल्यावर मी आक्रमकता दाखवली. पक्षानेही मला पाठिंबा दिला आणि मग मी ते घोटाळे लोकांसमोर मांडले. मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश मला दिल्लीतून आले होते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना पक्षानेच तसा आदेश दिला होता.