शिवसेनेच्या नेत्या व मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी शिवसेनेतील बंडखोर नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “रामदास कदम शिवसेनेत आल्यापासून ते पक्षाच्या मोठ्या पदावरच राहिले आहेत. २० वर्षे आमदारकी भेटली. मुलाला आमदारकी, त्यांना विधान परिषद मिळाली,” असं मत किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलं. तसेच शिवसेनेत सगळेच राबतात, पण सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते, असंही सूचक वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “आम्ही कोणाचा आदर्श ठेवायचा? निष्ठावंत म्हणून कुणाकडे बघायचं? शिवसेना सोडून जायचं असेल तर नक्की जा, पण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी पदं दिली, त्याचा मान ठेवा. शिवसेनेत सगळेच राबतात, सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते. सगळ्यांनाच कुठे तुमच्यासारख्या पायघड्या घातल्या जातात.”

“असं करु नका, समस्त शिवसैनिकांना प्रचंड राग येतोय”

“तुम्हाला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणायचं नव्हतं, तर म्हणू नका. आदित्य ठाकरेंनी कधीच त्यांना साहेब म्हणायला सांगितले नाही. ते तुमच्याच विभागाचे मंत्री झाले आणि त्यांनी ते नावारुपाला आणलं. ते तुमच्याकडे बसून शिकत होते असं तुम्ही म्हणता. म्हणजेच ते शिवसैनिक म्हणून तुमच्याकडूनही शिकले. मात्र, तुम्हाला त्याचीही कदर नाही. असं करु नका. समस्त शिवसैनिकांना प्रचंड राग येतोय,” असा इशारा त्यांनी कदमांना दिला.

पाहा व्हिडीओ –

“तुमच्या वाट्याला चिखलच येणार”

“तुम्हाला जायचं असेल तर जा, पण मातोश्रीवर, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करू नका. तुम्ही जेथे जात आहात ते कमळ चिखलात आहे आणि हाच चिखल तुमच्या वाट्याला येणार आहे,” असंही पेडणेकर म्हणाल्या.

“दोन दिवसांपूर्वी म्हणाले पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत शिवसेनेत”

किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, “प्रत्येक शिवसैनिक रामदास कदम यांना भाई म्हणत असे. ज्या दिवसापासून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून ते पक्षाच्या मोठ्या पदावरच राहिले. २० वर्षे आमदारकी भेटली. मुलाला आमदारकी, त्यांना विधान परिषद मिळाली. शिवसेनेमधून ते निवडून गेले. असं असताना ते मधल्या काळात बरं नाही, बरं नाही या सबबीखाली लोकांपासून दूर राहायला लागले. मी त्यांच्या दोन्ही मुलांना बाबा कसे आहेत? आमदार कोण आहे असे प्रश्न विचारायचे.”

हेही वाचा : “शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार”; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले…

“मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील, पोरं कुठं जायची ती जाऊदे”

“जेव्हा जेव्हा आम्ही गोरेगावमध्ये गेलो तेव्हा तेव्हा रामदास कदम यांना भेटायला गेलो. मात्र, रामदास कदम यांच्यातील ‘भाई’ने या वयात काय केलं? दोन दिवसांपूर्वी म्हणाले मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील. पोरं कुठं जायची ती जाऊदे, पण मी शिवसेनेतच राहील असं म्हणत होते,” असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekar criticize shivsena rebel ramdas kadam amid allegation on uddhav thackeray pbs
First published on: 19-07-2022 at 21:17 IST