पावसाळयात महापूर, दिवाळीतील अवकाळी पावसामुळे कोल्हापूरातील रस्त्यांची दुरावस्था होऊन चाळण झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकारांचा उद्रेक सोमवारी समोर आला. खड्ड्यांतून सुटका करण्यासाठी सोमवारी कोल्हापूरकरांनी आनोखं आंदोलन केलं. कोल्हापूरकरांनी बिंदू चौकात चक्क खडी आणि डांबर यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता.

खडी आणि डांबराचं लग्न लावत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून वाहनधारकांची सुटका करण्याची मागणी जिल्हा वाहनधारक महासंघाने सोमवारी केली. जिल्हा वाहनधारक महासंघाने सोमवारी बिंदू चौकात खडी आणि डांबराचे लग्न लावून निषेधारत्मक आंदोलन केले. आंदोलनाचा पुढील टप्प्यात बुधवारी (ता. १३) दुपारी १२ वाजता दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.

या अनोख्या आंदोलनासाठी कार्यकर्ते ‘कोल्हापूर की खड्डेपूर’ अशी पिवळ्या रंगातील टोपी परिधान करुन डांबराचे बॅरेल, खडीचे पोते, आंतरपाट, मंगलाक्षता घेवून दाखल झाले. खड्ड्यांची पूजा केल्यानंतर मंगलाष्टकाही म्हणण्यात आल्या. वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनामुळे बघ्यांचीही चांगली गर्दी जमली. खडी आणि डांबराचे लग्न लावून दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बिंदू चौकातील खडड्याचे लग्न या अनोख्या आंदोलनावेळी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, महाराष्ट्र वाहतुक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, रिक्षा मालक सेना राजु जाधव, विजय गायकवाड, दिलीप सुर्यवंशी, काळी-पिवळी टॅक्सी युनियन अध्यक्ष अशोक जाधव, टेंपो ट्रव्हलर संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत आडसुळे, निलेश हंकारे आदींसह मिनीडोअर ऍटो रिक्षा, ऍपे रिक्षा, मिनीडोअर सहासिटर आदींसह विविध वाहनधारक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.