कोल्हापूर : कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फे ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश होणे अटळ आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तत्काळ प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतच्या पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, राजकीय जीवनात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न पाहता शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मी काम करत आहे. शहरातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांशीही माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. परंतु, या विषयात वैयक्तिक टीका- टिप्पणी करून ग्रामीण भागातील जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. त्यांच्या नेत्यांनी राजकारणापलीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. त्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका आजही शहरवासीयांना बसत आहे, असा आरोप त्यांनी केला.
कोल्हापूरची वाढ झपाट्याने होत असून, शहरानजीकच्या सर्व गावांमध्ये नागरी वस्ती विस्तारली आहे. या नागरी वस्तीतील लोक महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा नित्यनियमाने लाभ घेत आहेत. महापालिका हद्दीच्या आसपास असणाऱ्या आठ गावांना समाविष्ट करून कोल्हापूरची नैसर्गिक हद्दवाढ निश्चित झाली असल्याचे त्यांनी सांगितले.