कोल्हापूर : राष्ट्रीय व राज्याच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीत कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय राजकीय व्यवहार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सूर्यकान्त पाटील बुद्धीहाळकर, तौफिक मुल्लाणी, शशांक बावचकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी या निवडीची घोषणा केली आहे. राज्य पातळीवर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा वाहणारे सतेज पाटील यांना आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी त्यांनी गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दोनदा भूषवली होती.
तिघेजण सरचिटणीस
दरम्यान, सूर्यकान्त पाटील बुद्धीहाळकर यांच्या कुटुंबीयांनी काँग्रेस पक्षाचे काम सातत्याने केले आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले आहे. पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून काम पाहणारे माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी मौलाना आझाद महामंडळाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. इचलकरंजी शहर काँग्रेसचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले मल्हारपंत बावचकर यांची काँग्रेस परंपरा शशांक बावचकर हे चालवत आहेत. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून ते काम पाहणारे बावचकर दहा वर्षे नगरसेवक होते.