कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात १८ ऑगस्टला सुरू होत आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापूर, इचलकरंजीत भाजपच्या वतीने शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ढोल-ताशाच्या गजरात ठेका धरत, साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, की या निर्णयामुळे कोल्हापूर विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात १० ते १५ शासकीय कार्यालये नव्याने निर्माण होणार आहेत. जिल्हा बार असोसिएशनने हा प्रश्न चिकाटीने लावून पूर्णत्वास नेला. प्रदेश सचिव महेश जाधव, ॲड. संपत पवार यांचे भाषण झाले.
इचलकरंजीत आनंदोत्सव
इचलकरंजीत मलाबादे चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करून साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना लवकर न्याय मिळणार आहे. सरन्यायाधीश न्या. भूषण गवई, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांचे आभार, असे आमदार राहुल आवाडे म्हणाले. पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार क्षीरसागर यांचा सत्कार
या ऐतिहासिक निर्णयानंतर, स्टेट यंग लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. चेतन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खंडपीठ स्थापन करण्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केल्याने हा गौरव करण्यात आला.
अनेक वर्षांचा लढा
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर मध्ये स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या चार दशकापासून या सहा जिल्ह्यातील वकील, खंडपीठ कृती समितीच्या माध्यमातून लढा देत आहेत. त्यासाठी अनेकदा उपोषण, ६५ दिवसांचे धरणे आंदोलन, न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार, लोक प्रतिनिधी समवेत मेळावे, वकील परिषद अशा मार्गाने लढा दिला जात होता. तर दुसरीकडे राज्य शासन, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडेही याबाबत सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्याकरिता जिल्ह्यातील आजवरच्या आजी-माजी पालकमंत्री, खासदार, आमदार यांनीही पाठपुरावा चालवलेला होता.