सावंतवाडी : गौरी गणपती उत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने आपल्या गावी परत येऊ लागले आहेत. मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव अशा विविध शहरांत नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले चाकरमानी गणेश चतुर्थीच्या सणासाठी हमखास कोकणात येतात. यंदा सुमारे १० लाख चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील असा अंदाज आहे. त्यामुळे कोकणातील गावे गजबजून गेली असून, स्थानिक बाजारपेठांमध्येही चैतन्याचे वातावरण आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्टपासून कोकण रेल्वेच्या जादा फेऱ्या सुरू झाल्या असून, त्या ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत एकूण ३५२ जादा फेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. या सर्व गाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असून, दैनंदिन रेल्वे गाड्यांनाही मोठी गर्दी आहे. रेल्वेबरोबरच एसटी आणि खासगी बसेसही मोठ्या संख्येने धावत आहेत.
चाकरमानी आपापल्या घरी लवकर पोहोचून घरांची साफसफाई आणि रंगरंगोटी करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराचे प्रकल्प नसल्यामुळे येथील तरुणवर्ग नोकरीसाठी शहरांमध्ये जातो, मात्र गणेशोत्सवासाठी ते आवर्जून परत येतात. या चाकरमान्यांच्या आगमनामुळे गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातील लोक शहरांतील बाजारपेठांमध्ये येत आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.