सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ कार सेवेला आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रोड स्थानकात थांबा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईहून आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी ही सेवा फक्त कोलाड आणि गोव्यातील वेर्णा या दोनच स्थानकांवर उपलब्ध होती, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. प्रवाशांची ही मागणी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आता नांदगाव येथे थांबा मंजूर केला आहे.

रो-रो सेवेमुळे चाकरमान्यांना आपली गाडी थेट रेल्वेतून कोकणात घेऊन येणे शक्य होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाची खराब अवस्था आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक प्रवासी या सेवेला प्राधान्य देत आहेत. आता नांदगाव येथे गाडी उतरवून ती सहजपणे रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर भागांमध्ये घेऊन जाणे सोपे होईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.

रो-रो सेवेचे वेळापत्रक:

कोलाड ते गोवा (वेर्णा):कोलाडहून सुटणार: दुपारी ३:०० वाजता, नांदगाव येथे पोचणार: रात्री १०:०० वाजता,नांदगावमधून सुटणार: रात्री १२:०० वाजता,वेर्णा (गोवा) येथे पोचणार: पहाटे ६:०० वाजता पोहोचेल.

गोवा (वेर्णा) ते कोलाड:वेर्णा येथून सुटणार: दुपारी ३:०० वाजता नांदगाव येथे पोचणार: रात्री ८:०० वाजता. नांदगावमधून सुटणार: रात्री १०:३० वाजता.कोलाड येथे पोचणार: पहाटे ६:०० वाजता पोहोचेल.

नांदगाव रोड स्थानकावर गाडी चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी खास प्लॅटफॉर्मची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे चाकरमानी गणेश भक्त प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे, अशी अपेक्षा वाहनधारकांना आहे.