सातारा: कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागातील जलवाहतुकीसाठी मागील काही काळापासून लॉँच व बार्ज यांच्या देखभाल दुरुस्ती व इंधनावरील खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाची मागणी प्रलंबित होती. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून विभागाने ७८ लाख ७ हजार २८२ रुपयांचा निधी वितरण करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोयना जलाशयातील जलवाहतूक सुरळीत चालण्यास यामुळे मदत होणार आहे. परिसरातील नागरिकांना दळण वळणासाठी फायदा होणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्यामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी १९७६-७७ पासून तापोळा (ता. महाबळेश्वर) परिसरात जलवाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. हा तराफा केळघर, तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या- मोठ्या वाहनांची पाण्यातून वाहतूक करत असतो. त्यामुळे कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. हा भाग दुर्गम असून, पर्यटक आपली वाहने ताराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा-ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात, असे पाटील म्हणाले.

तापोळा येथील जलवाहतुकीसाठी सध्या कार्यरत असलेल्या १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागामार्फत अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार १२ कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील वेतन, भत्ते व मानधन अदा करण्यासाठी ४४ लाख ७ हजार २८२ रुपये व लॉँच बार्जेसच्या देखभाल व दुरुस्ती व इंधनासाठी ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील खर्च भागविण्यासाठी ३४ लाख असा एकूण ७८ लाख ७ हजार २८२ रुपयांचा निधी पुणे विभागीय आयुक्तांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोयना जलाशयातील जलवाहतूक सुरळीत चालण्यास यामुळे मदत होणार आहे. परिसरातील नागरिकांना दळण वळणासाठी फायदा होणार आहे, असेही मकरंद पाटील यांनी सांगितले.

कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. हा भाग दुर्गम असून, पर्यटक आपली वाहने ताराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा-ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात.