सांगली : क्रांती सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनचा देशपातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार गुरुवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. केंद्रीय अन्न व खाद्य नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री श्रीमती निमूबेन भंभानिया व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष दिगंबर पाटील यांच्यासह संचालक मंडळाने स्वीकारला.
देशातील सहकारी साखर कारखान्याची राष्ट्रीय संघटना म्हणून राष्ट्रीय सहकारी साखर संघाकडून प्रतिवर्षी विविध विभागांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना कार्यक्षमतेबद्दल पुरस्कार दिले जातात. यासाठी भारत सरकार व सहकारमधील तज्ज्ञांची समिती नेमून कामाचे मूल्यमापन केले जाते. याचआधारे क्रांती कारखान्यास या पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात आले होते.
क्रांती कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक व शाश्वत शेतीची दिशा दाखवणाऱ्या ऊसविकास विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात येतात. क्रांती कारखान्याने ऊस विकासामध्ये भरीव कार्य करून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सरासरी एकरी उत्पादन वाढविले आहे. ऊसविकास योजनेतून ऊस लागवडीसाठी आवश्यक निविष्ठा पुरवठा करून देण्यासह जमीन, पाणी या राष्ट्रीय संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण, सेंद्रिय खते, ठिबक सिंचनचा वापर आदी शास्त्रीय पद्धतीचा स्वीकार करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे हा पुरस्कार मिळाला असल्याचे अध्यक्ष लाड यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव हेही उपस्थित होते.