दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी आलेल्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री अनंतकुमार आदींना लातूर विमानतळावरून परळीला जाऊ देण्यास पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नकार दिला. त्यामुळे परळीला न जाताच हे सर्व नेते लातूरहून दिल्लीला परतले.
परळीत बुधवारी अंत्यसंस्काराच्या वेळी संतप्त झालेल्या जमावाच्या उद्रेकामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले. मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी, अशी जमावाची मागणी होती. अंत्यसंस्कार पूर्ण होताच या मागणीसाठी संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडय़ांवर दगडफेक सुरू केली, तसेच मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या गाडय़ांनाही घेराव घातल्याचे वृत्त लातूरला येऊन धडकले.
मात्र, याच दरम्यान दुपारी सव्वादोनच्या सुमारास भाजपच्या वरील प्रमुख नेत्यांचे व मंत्र्यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते व परळीला जाण्यासाठी त्यांची लगबग चालली होती. मात्र, परळीतील आंदोलनाचे वृत्त आल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी या सर्वच नेत्यांना परळीला जाऊ देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे मुंडे यांच्या अंत्यविधीला उपस्थित न राहताच हे नेते दिल्लीला परतले.