सातारा : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून, संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाने महाबळेश्वर तापोळा मुख्य रस्त्यावर पहाटे वाघेरा नजीक दरड कोसळून माती झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मांघर मार्गे वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांच्या प्रयत्नाने सकाळी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत रस्ता वाहतूकसाठी खुला करण्यात आला.
मे महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाने काहीशी उसंत घेतली. जून महिन्यात प्रारंभीपासून धीम्या गतीने पावसाची सुरुवात झाली. ऊन, पावसाचा खेळ सुरू होता. आता मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये ३११.६ मिमी (१२.२६ इंच) पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर पर्यटन नगरीत सुट्ट्यांसाठी आलेल्या पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता महाबळेश्वरवासीयांना पावसाळी हंगामातील तयारीला वेग आला आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात दिवसभर रिपरिप सुरूच होती. पावसामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना धुक्यातून गाड्या चालवताना शिकस्त करावी लागत आहे.