छत्रपती संभाजीनगर – लातूरमधील निलंगा तालुक्यातील सरवडी गाव सोमवारी शोकसागरात बुडाले. गावातील तीन जीवलग मित्र तथा उमद्या तरुणांचा औसा-लामजना मार्गावरील दावतपूर पाटीजवळ रविरात्री ११.३० च्या सुमारास कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी मृत तरुणांवर गाव परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा अवघे गाव निःशब्द झाले होते. सोमनाथ दयानंद हिप्परगे (वय २२), दिगंबर दत्ता इंगळे (२७) व अभिजीत शाहूराज इंगळे (२३), अशी मृत तरुणांची नावे आहेत. दिगंबर व अभिजीत हे दोघे चुलतभाऊ होते.
लातूरहून निलंगा तालुक्यातील तीन तरुण आपला दुचाकीवरून सरवडी या आपल्या गावी जात होते. एमएच – १४ /एफजी ७१७२ या क्रमांकाच्या कारने तरुणांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात तरूण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किसन मरडे यांच्यासह सहकाऱ्यांनी जखमींना तत्काळ पुढील उपचारासाठी औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील अधिका-यांनी तिन्ही तरुणांना मृत घोषित केले.
सोमवारी सकाळी मृत तरुणांचे पार्थिव सरडीत येताच अवघे गाव शोकसागरात बुडाले. तीन उमद्या तरुणांच्या मृत्यूने अवघे गाव आणि विशेषतः ज्येष्ठ मंडळी निःशब्द होऊन अंत्यसंस्काराच्यावेळचे सोपस्कार ओलावलेल्या डोळ्यांनी पाहात होती. त्यात कुटुंबातील सदस्यांचा आणि तरुणांच्या मातेचा आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता. अभिजीत इंगळे हा दोन मुलीनंतरचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दोन्ही विवाहित बहिणी व आईचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अभिजीत व दिगंबर यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत शेजारी-शेजारीच तर सोमनाथ हिप्परगेवर त्याच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.