Laxman Hake on Parth Pawar & Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील १,८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली पार्थ पवार व दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने ४० एकरांचा भूखंड कुठलंही शासकीय शुल्क न भरता खरेदी केल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. यावरून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांवर विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पार्थ पवार व अजित पवारांविरोधात फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे.

पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर ‘मुळशी पॅटर्न २’ किंवा ‘पवार पॅटर्न बारामती’ असा चित्रपट बनवा, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की “१८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारांनी केलं. आई वडिलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारांच्या नावे केले, अशी पत्रकार परिषद बहुजन नेते काळुराम चौधरी यांनी केली म्हणजे बाराखडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली.

भविष्यात पार्थ पवारांनी या चूका करू नये ; लक्ष्मण हाके

हाके म्हणाले, बापाने ७० हजार कोटी पचवले, साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १,५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. मात्र नवा जमीन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत. उदाहरणार्थ, एक लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ३०० कोटींचा व्यवहार करु नये. शेकडो कोटींचा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करु नये. सरकारी खात्याची जमीन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी बाळगावी. भविष्य काळात मरिन ड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल, विधानभवन अशा जागांवर हात मारावा. किरकोळ महार वतनांच्या. जमिनींकडे दुर्लक्ष करावे.”

“जमीन नावे करताना पार्थ पवारांनी किती जणांना उचलून आणलं?”

“प्रत्येकाकडे कला असते. पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात १५, २० हजार कोटींच्या जमीन खरेदीचा घोटाळा करावा. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम, ओबीसी, उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे. पार्थ पवारांनी महार वतनाची जमीन कंपनीच्या नावे केली तेव्हा किती जणांना उचलून आणलं? किती लोकांच्या अन्नात माती कालवली? नेमकं या प्रकरणात काय काय घडलं असेल याचं सत्य महाराष्ट्रापुढे येईल असं वाटत नाही.”

हाके यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “जमिनीच्या सातबाऱ्यावर ‘मुंबई सरकार’ तसेच ‘महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग’ व इतर तत्सम शासकीय उल्लेख असतानाही पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली. उद्या हे पवार महाराष्ट्राचे विधानभवन पण आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत”