सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे येथील देऊळवाडी परिसरात काल रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार जणांवर हल्ला करून जखमी करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने आज सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले. वन विभागाच्या अथक परिश्रमामुळे ही मोहीम फत्ते झाली असून, बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
हल्ल्याची घटना आणि शोधमोहीम
रविवारी सायंकाळी बिबट्याने मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथे प्रभाकर मुळीक (वय ६०), सूर्यकांत सावंत (वय ६३), आनंद न्हावी (वय ५४) आणि पंढरी आजगावकर (वय ५२) या चौघांना जखमी केले होते. हल्ल्यानंतर बिबट्या त्याच ठिकाणी दबा धरून बसल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यानंतर तात्काळ वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. रात्री काळोख झाल्याने रविवारी रात्री ही मोहीम थांबवण्यात आली होती. जखमींवर गोवा येथील बांबोळी येथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता वन विभागाने पुन्हा एकदा बिबट्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. यावेळी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी फटाके वाजवण्यात आले. कोंडुरे येथील ग्रामस्थ सुधीर मुळीक आणि संदीप मुळीक यांना बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी पाहिले असता, बिबट्या नदीकाठच्या पंप शेडमध्ये असल्याचे दिसून आले.
यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत बिबट्या पंप केबिनमधून बाहेर येत नव्हता. पंप शेडचा होल लहान असल्याने तो तोडून मोठा करण्यात आला, मात्र तरीही पिंजरा योग्य पद्धतीने लागत नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात जाण्यास तयार नव्हता.
अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दुसरा पिंजरा आणून तो पंप शेडच्या दरवाज्याजवळ लावण्यात आला. दरवाजा कापून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने बिबट्याला जेरबंद केले.
ग्रामस्थांचा सहभाग आणि जखमींची स्थिती: या बिबट्याने चार जणांना जखमी करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे कोंडुरे येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी मळेवाड कोंडुरेचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री नितेश राणे, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले. बिबट्या पकडण्यासाठी कोंडुरे येथील स्थानिक ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य केले. पकडलेला बिबट्या पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.