कराड : कराडशेजारील नडशी येथे दुचाकीवर चाललेल्यांवर अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एका लहान मुलासह एक महिला जखमी झाली आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरातील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
नडशी गावात रात्रीच्या सुमारास प्रदीप थोरात हे दुचाकीवर जात असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. यामध्ये हर्षदा थोरात (वय २८) हिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर त्यांचा मुलगा मानस (वय ४) यासही दुखापत झाली. हर्षदाला तातडीने येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नडशी गाव आणि एकूणच परिसरात बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून, चारच दिवसांपूर्वी मयूर गुजर यांच्या आणि पंधरा दिवसांपूर्वी समाधान माने यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला होता. या सततच्या जीवघेण्या प्रकारांमुळे नडशी व लगतच्या गावातील लोक भयभीत झाले आहेत. त्यांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागमी केली आहे. सहायक उपवनसंरक्षक जयश्री जाधव यांनी नडशी गावाला तातडीने सहकार्यां समवेत भेट दिली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, रोहन माने, वनरक्षक सानिका घाटगे, शीतल पाटील आदी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सहायक उपवनसंरक्षक जयश्री जाधव यांनी मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी अनेक उचित सूचना दिल्या. त्यानुसार रात्री अपरात्री एकट्याने फिरणे टाळावे, बिबट्यांची चाहूल, हालचाल याबाबत समाज माध्यमाद्वारे एकमेकांना माहिती देत रहावी, रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी टॉर्च वापरावा, शेतकरी व ग्रामस्थांनी आपले पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावेत आणि कुठेही बिबट्या दिसल्यास अथवा तसा संशय वाटल्यास वन विभागाला कळवावे, तसेच बिबट्यांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यांजवळ जाणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन जयश्री जाधव यांनी या वेळी शेतकरी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, गावपुढारी यांच्या समवेत चर्चा करताना केले.
दरम्यान सततच्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी वन विभागाच्या कामकाजावर नापसंती व्यक्त करीत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेला मोकळा पिंजरा आणि कॅमेरा ट्रॅप याला यश न आल्याने नडशी ग्रामस्थ व लगतच्या गावातील लोक वन विभागावर रोष व्यक्त करत आहेत. वन विभाग केवळ पिंजरा लावण्याची औपचारिकता पूर्ण करीत असून, पिंजऱ्यात भक्ष्यच नसेल तर, पिंजऱ्यात बिबट्या कसा सापडणार, असा प्रश्न नडशी व लगतच्या गावातील संतप्त ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या सार्याची आता वन विभाग कशी दखल घेत आणि बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्याच्या समस्येतून लोकांची सुटका कशी करते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.