चिपळूण : कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. स्वतःच्या बचाव दरम्यान शेतकऱ्याने बिबट्याला धरून जमिनीवर आपटले आणि टोकदार भाल्याने त्याला जखमी केले. या झटापटी दरम्यान बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. चिपळूण तालुक्यातील मौजे वारेली येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. 

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तोंडली – वारेली परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. तोंडली – वारेली गावच्या सीमेवर आशिष शरद महाजन (वय वर्ष ५५) या शेतकऱ्याचे घर आहे. या शेतकऱ्याकडे काही जनावरे आणि पाळीव कुत्रा आहे. शनिवारी रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान महाजन यांचा कुत्रा जोरजोराने भुंकत होता. तो का भुंकतोय हे पाहण्यासाठी महाजन घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना कुत्र्याच्या दिशेने येणारा बिबट्या दिसला. महाजन यांनी कुत्र्याला बिबट्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर बिबट्याने महाजन यांच्यावरच हल्ला चढवला दोघांमध्ये झटापट झाली.  या झटापटीत बिबट्याने महाजन यांच्या दोन्ही पायावर, उजव्या हाताला, तोंडावर आणि डोक्यावर जखमा केल्या रक्तबंबाळ झालेल्या महाजन यांनी बिबट्याला पकडून जमिनीवर आपटले. दोघांमध्ये सुरू असलेल्या संघर्ष महाजन यांच्या पत्नी सुप्रिया यांनी पाहिला घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या सुप्रिया यांनी टोकदार भाला आणून महाजन यांना दिला.

महाजन यांनी प्रथम भाल्याने बिबट्याला मानेवर वार केले नंतर त्याच्या छातीत भाला घुसविला. या झटापटीमध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. दोघांमध्ये संघर्ष सुरू असताना सुप्रिया यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ ही घटनास्थळी दाखल झाले. महाजन हे गंभीर जखमी झाल्याचे पाहिले. त्यांच्यावर वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले.  त्यानंतर डेरवण येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनेच्या ठिकाणी जावून मृत बिबट्याची तपासणी केली असता हा मृत बिबट्या मादी जातीची असून तीचे वय अंदाजे १.६ ते २ वर्ष असल्याचे आढळून आले आहे. महाजन यांच्याबरोबर झालेल्या झटापटीमध्ये बिबट्याच्या छातीवर, पायावर आणि मानेवर जखम असलेचे दिसून आले आहे.  नाकाच्या शेंड्यापासून ते शेपटीच्या टोकापर्यंत या बिबट्याशी  लांबी १९० से.मी आहे. पुढिल पायाची उंची ५४ से.मी, मागिल पायाची उंची ६० से.मी इतकी आहे. बिबट्याच्या पायाचे पंजे, नखे, मिशा व दात तपासले असता ते सुस्थित असल्याची खात्री वन विभागाने करून घेतली. त्यानंतर या बिबट्याला ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 बिबट्याला ढेर केल्यानंतर रक्तबंबाळ  झालेले महाजन जमिनीवर पडलेले होते. ते मोठ्याने श्वास घेत होते. त्याच ठिकाणी त्यांची बायको सुप्रिया रडत होती. परिसरातील नागरिक ही घटनास्थळी जमले होते.  वहाळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर  घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी महाजन यांचे शरीर तपासले. तेव्हा आपल्याला कुठे कुठे जखमा झाले आहेत, हे महाजन स्वतः डॉक्टरांना सांगत होते. डॉक्टरांनी त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला. तेव्हा ‘मी अजिबात घाबरलेलो नाही.  सुप्रिया एकदम ओके आहे असे महाजन यांनी डॉक्टर आणि आपल्या पत्नीला सांगितले. तेव्हा सर्वांनी त्यांच्या हिमतीची दाद दिली.