सांगली : पुणे-बंगळूरु महामार्गावर इटकरे गावाजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने नर बिबट्या गंभीर जखमी होण्याची घटना मध्यरात्री घडली असून, पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला हलविण्यात आले आहे. सहा वर्षांचा पूर्ण वाढ झालेला हा नर बिबट्या असल्याचे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अजित साजणे यांनी दिली.
मध्यरात्री इस्लामपूरच्या बाजूने महामार्ग बिबट्या ओलांडत असताना इटकरे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्याचा मागील पाय जायबंदी झाला. अपघातात बिबट्या जखमी झाल्याची माहिती वन विभागाला कळविण्यात आली. वन विभागाचे वनरक्षक भीवा कोळेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव पथकाच्या मदतीने बिबट्याला इस्लामपूर कार्यालयात आणण्यात आले. या ठिकाणी पशुवैद्यकीय तज्ज्ञाकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. सलाइन लावण्यात आले. यानंतर वन विभागाच्या विशेष वाहनाने त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे.