अहिल्यानगर : पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अमन पन्नालाल खुंटे असे या मुलाचे नाव असून, आईसमोरून बिबट्याने त्याला पकडून नेले. पारनेर शहरातील सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली. दरम्यान, वनविभागाने राबवलेल्या शोध मोहिमेत अमनचे केवळ शीर हाती लागले. या घटनेने पारनेर शहरासह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने मोहीम सुरू केली आहे.

अमनचे वडील व आई हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील मजूर कुटुंब. ते पुणेवाडी (ता. पारनेर) येथे कामासाठी आले होते. ठेकेदार उत्तम रेपाळे यांच्या वाहनातून ते कामासाठी जात व पुन्हा रात्री सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावरील वास्तव्य ठिकाणी परतत असत. काल, सोमवारी रात्री जेवणानंतर अमनची आई त्याला लघुशंकेसाठी खोलीबाहेर घेऊन आली.

त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अत्यंत वेगाने झडप घातली आणि क्षणात बालकाला जबड्यात पकडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. ते पाहून आई घाबरून गेली. धक्क्यातून सावरून तिने आरडाओरडा केल्यावर अमनचे वडील व परिसरातील मजूर धावले. मात्र, अमनचा शोध लागला नाही.

ठेकेदार रेपाळे यांनी पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांच्याशी संपर्क साधला. धाडे यांनी कर्मचारी व ग्रामस्थांसह वनविभाग पिंजून काढला. मात्र, अंधार व झुडपांमुळे शोध घेण्यात मर्यादा पडल्या. ठेकेदार उत्तम रेपाळे, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, राजू भोर, ठकाराम रेपाळे, सुहास मोढवे, नीलेश चेडे आदी ग्रामस्थ शोध मोहिमेत सहभागी झाले होते. वनविभागाने राबवलेल्या शोध मोहिमेत अमनचे केवळ शीर हाती लागले. या घटनेने पारनेर शहरासह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने मोहीम सुरू केली आहे.

गाडगे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

आठ दिवसांतील ही पारनेर तालुक्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी २ सप्टेंबरला गणेश तुळशीराम गाडगे या ४० वर्षीय मजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. खासदार नीलेश लंके यांनी आज, मंगळवारी गाडगे कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले तसेच वनविभागाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांची मदत गाडगे कुटुंबीयांना जाहीर करण्यात आली असून, त्यातील १० लाख रुपयांची रक्कम गाडगे कुटुंबीयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम लवकरच मिळेल, असे खासदार लंके यांनी सांगितले.