अलिबाग : अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ परिसरात बिबटय़ा आढळून आला आहे. वनविभाग आणि कंपनी प्रशासनाने यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

गेली दोन दिवस समाजमाध्यमांवर अलिबाग परिसरात बिबटय़ा आल्याची चर्चा सुरू होती. काही फोटोही प्रसारित झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. समाजमाध्यमांवर फिरत असलेली छायाचित्र ही आरसीएफ कंपनीच्या परिसरातील असल्याची चर्चा सुरू होती. या वृत्ताला कंपनी प्रशासन आणि वन विभागाने दुजोरा दिला आहे. कंपनीच्या सुरक्षारक्षकांना गस्त घालताना हा बिबटय़ा दिसल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या परिसरात झुडपात हा बिबटय़ा वावरतांना दिसला होता. यानंतर याबाबतची माहिती कंपनी प्रशासनाकडून वन विभागाला देण्यात आली. त्यांनी तात्काळ या परिसराची पहाणी केली.

काही दिवसांपुर्वीच मांडवा परिसरातील कोळगाव परिसरात बिबटय़ा दिसल्याचे समोर आले होते. यानंतर वन विभागाने या परिसरात गस्त घालून पहाणी केली होती. ट्रॅप कॅमेरेही बसवले होते. पण बिबटय़ा आढळून आला नव्हता. आता आरसीएफ परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाल्याने या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वन अधिकारी संजय कदम यांनी केले आहे. अलिबाग तालुक्यात बिबटय़ांचे दर्शन होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी १९८० च्या दशकात अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथे, तर २००२ मध्ये परहुरपाडा येथे बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या परिसरात बिबटय़ांचा वावर फारसा दिसून आला नव्हता. आता जवळपास २० वर्षांनी बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. अन्नाच्या शोधात हा बिबटय़ा किनारपट्टीवरील भागात आला असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.