scorecardresearch
Live

MNS Andolan: ….तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे

Hanuman Chalisa Loudspeaker Row: मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली असून राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावत आंदोलन केलं जात आहे. दरम्यान काही ठिकाणी मशिदींनी भोंग्याचा वापर करणं टाळलं तर काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची स्थिती पहायला मिळाली.

पोलिसांनी राज्यभरात मनसेच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून ताब्यात घेतलं आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थबाहेरील मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.

दरम्यान राज ठाकरे यांनी दुपारी १ च्या सुमारास पत्रकार परिषद घेत जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हा सामाजिक विषय असून त्याला धार्मिक वळण दिलं तर आम्हीदेखील देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवर भोंग्याचा वापर न करणाऱ्या मौलवींचे आभारदेखील मानले आहेत.

Live Updates

Raj Thackeray Loudspeaker Row: जोपर्यंत भोंग्यांचा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.

13:34 (IST) 4 May 2022
विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार – राज ठाकरे

“हा एक दिवसाचा विषय नाही. ४ तारीख पकडू नका. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार,” असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

13:33 (IST) 4 May 2022
हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार, राज ठाकरेंचा इशारा

दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमची लोकं त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज असं राज ठाकरे म्हणाले.

13:29 (IST) 4 May 2022
धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का? राज ठाकरेंचा सवाल

“महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचंय ही हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावं लागेल. ३६५ दिवस दिवसभरात चार, पाच वेळा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय. यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का? पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत. जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

13:28 (IST) 4 May 2022
“हे कोणत्या काळात जगतायत माहिती नाही”

“आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करताय? मोबाइलच्या काळात, संवादाची साधने एवढी असताना माणसं पकडून काय होणार. हे अजून ६०-७० दशकांचा विचार करताय का?एवढा मुर्खपणा… हे कोणत्या काळात जगतायत माहिती नाही”, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.

13:26 (IST) 4 May 2022
…ते भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं – राज ठाकरे

“औरंगाबादच्या सभेदरम्यान अजान सुरु झाली. मी पोलिसांना बंद करण्यासाठी विनंती केली. ते भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं मला सांगा. आम्ही शांततेत समजावून सांगतोय ती समजून घ्यावं,” असं राज ठाकरे म्हणाले.

13:16 (IST) 4 May 2022
३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता, राज ठाकरेंची विचारणा

३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता. आम्हाला दिवसाची परवानगी देणार आणि यांना ३६५ दिवसांची देणार कशासाठी? यांनी पण सुप्रीम कोर्टाच्या नियमांमध्ये बसून रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

13:14 (IST) 4 May 2022
अजान लावणाऱ्या मशिदींवर कारवाई होणार का? राज ठाकरेंचा सवाल

मुंबईत ११४० मशिदी असून त्यापैकी १३५ मशिदींवर पाच वाजण्याच्या आधी अजान लावण्यात आली. विश्वास नांगरे पाटील यांनी फोन करुन सर्वांशी चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. या मशिदींवर कारवाई होणार की फक्त आमच्या मुलांनाच उचलणार आहात. सामंजस्याने हाताळला तर हा विषय सर्वांचा आहे. आमच्यामुळे ९२ टक्के अजान झालं नाही असं आमचं म्हणणं नाही असं राज ठाकरे म्हणाले.

13:14 (IST) 4 May 2022
जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार – राज ठाकरे

तुम्हाला माइक आणि स्पीकर कशाला लागतो? कोणाला ऐकवायचं आहे तुम्हाला?. हे भोंगे उतरवले पाहिजेत. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. आज अजान लावली नाही म्हणून आम्ही खूश होणार नाही. हनुमान चालिसा वाजत राहणार. हा सामाजिक विषय आहे. पण जर त्यांनी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

13:09 (IST) 4 May 2022
अजान लावणाऱ्या मशिदींवर कारवाई होणार का? राज ठाकरेंचा सवाल

मुंबईत ११४० मशिदी असून त्यापैकी १३५ मशिदींवर पाच वाजण्याच्या आधी अजान लावण्यात आली. विश्वास नांगरे पाटील यांनी फोन करुन सर्वांशी चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. मग या मशिदींवर कारवाई होणार की फक्त आमच्या मुलांनाच उचलणार आहात. सामंजस्याने हाताळला तर हा विषय सर्वांचा आहे. आमच्यामुळे ९२ टक्के अजान झालं नाही असं आमचं म्हणणं नाही असं राज ठाकरे म्हणाले.

13:06 (IST) 4 May 2022
…म्हणून संध्याकाळऐवजी आत्ता पत्रकार परिषद घेतली – राज ठाकरे

काही सूचना आत्ताच द्यायच्या असल्याने संध्याकाळऐवजी आत्ता पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रभरातून आणि बाहेरुनही आम्हाला फोन येत आहेत. पोलिसांचेही फोन येत आहेत. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. पण हे फक्त आमच्या बाबतीत का होत आहे? जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि करत नाही त्यांना मोकळीक देणार अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली.

12:44 (IST) 4 May 2022
सोलापुरात मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी

सोलापुरात मनसेकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सोन्या मारुती मंदिरातील अॅम्लिफायर जप्त करण्यात आला. यानंतर मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.

12:41 (IST) 4 May 2022
उस्मानाबादमध्ये हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन , एकत्र नमाज व हमुमान चालीसा पठण

मानवता हाच खरा धर्म असा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत नमाज व हनुमान चालीसा पठण केले. सर्व धर्म एक आहेत, केवळ राजकीय हेतूने सध्याचे राजकारण सुरु आहे. फोडा व राज्य करा ही निती आजही वापरली जात आहे. मात्र तरुणांनी एकत्र यावे असा संदेश यावेळी देण्यात आला.

12:34 (IST) 4 May 2022
बीडमधील जिल्हाध्यक्ष सुमंत धस पोलिसांच्या ताब्यात

बीडच्या केज येथे हनुमान चालीसा पठणाआधीच जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याने मनसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलीस दडपशाही करत असल्याच म्हणत मनसैनिकांनी त्याचा निषेध केला आहे.

12:19 (IST) 4 May 2022
पुण्यातील मनसेचे नेते हेमंत संभूस ताब्यात

पुणे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु असून हेमंत संभूस यांच्यासह १० ते १२ जणांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

12:18 (IST) 4 May 2022
मुंबईतील फक्त १३५ मशिदींवर लाऊडस्पीकरचा वापर

गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एकूण ११४० मशिदी आहेत. यामधील फक्त १३५ मशिदींवर लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला.

11:51 (IST) 4 May 2022
सख्खा चुलत भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर होणारी ही बेंबीदुखी, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका

जास्त महत्व देण्याची गरज नाही. खळखट्याक, टोल सगळं मागे पडलं आहे. सख्खा चुलत भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर होणारी ही पोटदुखी नसून बेंबीदुखी आहे. बेंबीच्या देठापासून हे सुरु आहे असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. सरकारकडून काम करुन घ्यायचं असेल तर विधायक कामाबद्दल बोला असंही त्यांनी म्हटलं आहे.

11:40 (IST) 4 May 2022
शिवतीर्थबाहेर मनसैनिकांची धरपकड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. यावेळी झटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे.

11:26 (IST) 4 May 2022
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांच्या हातून निसटले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी मुंबई पोलीस मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी आले होते. मात्र ते पोलिसांच्या हातून निसटले आणि तेथून निघून गेले.

11:19 (IST) 4 May 2022
ठाण्यातील राबोडी येथे भोंग्यांविना नमाज पठण

ठाण्यातील राबोडी येथे एकूण १३ मशिदी आहेत. पहाटेचं नमाज पठण करताना याठिकाणी भोंगे वाजविण्यात आले नाहीत. येथील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करणार असल्याचे पोलिसांना सांगितले.

11:16 (IST) 4 May 2022
पुण्यात महाआरती करणारे मनसे कार्यकर्ते ताब्यात

राज ठाकरे यांनी आरती केलेल्या पुण्यातील कुमठेकर रोडवरील खालकर चौक येथील मारुती मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आलं. याच मंदिरात महाआरतीदेखील करण्यात आली. यानंतर पोलिसांनी मनसेचे अजय शिंदे यांच्या सह कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.

11:11 (IST) 4 May 2022
वाशिममध्ये अजानच्या वेळेस मनसेकडून हनुमान चालीसा पठण

वाशिममध्ये भोंग्यावर अजान सुरु होताच मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा लावण्यात आली.

11:06 (IST) 4 May 2022
राज ठाकरेंनी आरती केलेल्या मंदिरात आज महाआरती

पुण्यातील कुमठेकर रोडवरील खालकर चौक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मारुती मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते. याच मंदिरात आज महाआरती करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक राज्य सरचिटणीस अजय शिंदे होते. विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे.

11:03 (IST) 4 May 2022
पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त, पोलिसांची गल्ली बोळात गस्त

मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची गल्ली बोळात गस्त सुरु आहे. सोमवार पेठ, सदाशिव पेठ, कोथरूड, कात्रज भागावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

10:59 (IST) 4 May 2022
पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले ताब्यात

पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. चिखले हे त्यांच्या घरी असताना निगडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना ताब्यात घेतल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले आहे.

10:52 (IST) 4 May 2022
राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे भोंग्यांविरोधातील आंदोलनाबाबत आपली पुढील भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.

10:43 (IST) 4 May 2022
आंदोलन कशी करायची हे शिवसनेकडून शिका, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला

तुम्ही तुमचे भोंगे बेकायदेशीर लावणार असाल तर आंदोलन करत आहात की बेकायदेशीर कृत्य करत आहात ते पहा. धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे असं शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. आंदोलन फक्त चिथावणीसाठी नसतात. गेली ५० वर्ष शिवसेना आंदोलन करत आहे असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात जरी आघाडी सरकार असलं तरी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत, बाळासाहेबांचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांना रस्त्यावंरील नमाज आणि मशिदींवरील भोंग्यांचं काय करायचं याचा सल्ला दुसऱ्यांकडून घेण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत.

प्रसिद्धीसाठी आंदोलनं करु नयेत असं सांगताना त्यांनी राजकारणात काही नवखे हवशे असता असा टोला त्यांनी लगावला. तसंच इतिहास माहिती नसेल तर बाळासाहेब समजून घ्या. हवं तर आम्ही भाषणाच्या कॅसेट्स पाठवून देऊ असंही ते म्हणाले.

10:35 (IST) 4 May 2022
रझा अकादमी आणि PFI सारख्या संघटनांवर बंदी घाला, नितेश राणेंची मागणी

भाजपा नेते नितेश राणे यांनी आज सकाळी तीन ट्वीट केले असून त्यामधून भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच राज्य सरकारवर निशाणा साधताना रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

“एक सच्चा मुस्लीम कधीही त्याच्या देशाविरुद्ध किंवा राज्याविरुद्ध जाणार नाही. ते हिंदू किंवा इतर कुणाहीइतकंच त्यांच्या मायभूमीवर प्रेम करतात. पण रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनाच द्वेष आणि भेदभाव पसरवततात. अमरावती, नांदेडमधील दंगली हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांना संपवण्याची वेळ आली आहे”, असं नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1521700198619422721

10:31 (IST) 4 May 2022
कल्याणामध्ये भोंग्याविना अजान

कल्याण डोंबिवलीमधील ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. मंगळवार रात्रीपासूनच मजीद मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मशीद, मंदिराबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.

दरमयान बुधवारी कल्याण परिसरातील मशिदींमध्ये सकाळच्या सुमारास अजान भोंग्यांविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते.

10:24 (IST) 4 May 2022
शरद पवारांची सह्याद्रीवर बैठक; मविआचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. सह्याद्रीवर ही बैठक होणार असून अजित पवार, आदित्य ठाकरे या बैठकीला हजर असतील. गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलदेखील या बैठकीत उपस्थित असतील. मनसेच्या आंदोलनावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

10:18 (IST) 4 May 2022
राज ठाकरेंनी बाळासाहेबांचा व्हिडीओ केला शेअर

राज्यभरात मशिदींवरील भोंग्यांवरुन आंदोलन सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील भोंग्यासंबंधी बोलताना दिसत आहेत.

https://twitter.com/RajThackeray/status/1521694002197975040

10:16 (IST) 4 May 2022
नवी मुंबईतील मनसे कार्यकर्ते, नेते ताब्यात

नवी मुंबईत पोलिसांनी मनसेचे नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई सहसचिव नितीन लष्कर, विभाग अध्यक्ष भूषण आगिवले, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष दशरथ सुरवसे ऐरोली येथील जामा मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जमले असता मनसे पदाधिकाऱ्यांना रबाले पोलिसांनी ताब्यात घेतलं.

10:11 (IST) 4 May 2022
कल्याण डोंबिवलीत मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची धरपकड

कल्याण डोंबिवलीतील ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मनसेच्या २० ते २५ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

राज्यभरात १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दोन लाख अधिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ कंपन्या आणि ३० हजार गृहरक्षक सतर्क ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Live blog mns raj thackeray masjid loudspeaker hanuman chalisa maharashtra government police sgy

ताज्या बातम्या