अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. सरकारकडून पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, एकीकडे हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालेलं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोझा वाढत जातोय. त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. सरकारला कर्जमाफी करता येत नसेल तर सरकारने आमचे अवयव गहाण ठेवून घ्यावेत, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी हिंगोलीतील काही शेतकरी मुंबईत आले असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली आहे.
हिंगोलीत शेतकऱ्यांनीही या पत्रकार परिषदेत व्यथा मांडली. शेतकरी म्हणाले, शेतकरी अडचणीत असताना, कर्जबाजारी असताना दुसरं काही विकायला नसल्याने स्वतःचे अवयव विकायला मुंबईत आलो आहोत. हे सरकार शेतकऱ्यांच्या नावावर राज्य करत आहे. परंतु, ते शेतकऱ्यांना अटक करत असतील तर मी या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाला. बोंड अळीमुळे कापूस उद्ध्वस्त झाला. दोन चार कोटी शेतकऱ्यांच्या पदरात पडले, त्याला भाव द्यायला सरकारला तयार नाही. पेरणीसाठी बँकांकडून कर्ज काढलं. आता हे पीककर्ज भरण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत. जमीन, घर बँकेत गहाण आहे. त्यामुळे आम्ही आमचे अवयव विकायला काढले. ७५ हजारांत आम्ही लिव्हर, ९० हजारात किडनी आणि २५ हजारांत आम्ही डोळे गहाण ठेवले आहेत. कारण आमचे जास्तीत जास्त तीन लाखांचं शेतकऱ्यांचं कर्ज आहे. त्यामुळे सरकारने हे अवयव विकत घ्यावं आणि आमची कर्जफेड करावी. आम्हाला सहानुभूती नको. सरकारने आम्हाला दडपवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला गाडीत बसवलं. पण कुठे चाललो हे काही सांगितलं नाही.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्यानंतंर उद्धव ठाकरे म्हणाले, हिंगोलीच्या शेतकऱ्यांना खासदार विनायक राऊत भेटले. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून न्याय मिळेल म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना विरोधी पक्षनेत्याकडे पाठवलं. परंतु, या सर्व शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हे शेतकरी होते. त्यांचा गुन्हा काय होता, काय म्हणून त्यांना अटक केली? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
हेही वाचा >> “पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं…”, मराठा आरक्षणावरून अजित पवारांचा भुजबळ आणि जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा
“स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त असताना दुसऱ्याच्या घरात धुणीभांडी करायला जाणारे लोक राज्यकारभार करायला नालायक आहेत. हा शब्द यांना लागला तर काय करायचंय ते करतील. या शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली आहे, मग या सरकारला काय बोलायचं? कोणत्या शब्दांत त्यांचं गुणगान करायचं?” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
पदाधिकाऱ्यांना आवाहन
“विनायक राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगतो की जिथे जिथे संकट आहे तिथे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मोठे मोर्चे घेऊन जा. काल परवाचे पंचनामे सोडा, त्या आधीचे पंचनामे केलेत का? त्याची नुकसान भरपाई कधी मिळणार आहे? किती मिळणार आहे? हे प्रश्न विचारा.
पीकविम्याची रक्कम कोणाच्या खिशात गेली?
“पूर्वी फक्त ९० लाख शेतकरी विमा घ्यायचे, आता पिकविमा योजनेतून पावणे दोन कोटी शेतकरी विमा घेत आहेत. आठ हजार कोटी पीकविम्याच्या बोडक्यावर घातले आहेत. विमा कंपन्यांचे ऑफिस बंद आहेत. ते कोणाचे फोन घेत नाहीत. मग हा पैसा या कंपन्यांच्या माध्यमातून कोणाच्या खिशात गेला?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
“नुकसान भरपाई, पंचनाम्याचे खेळ थांबवा. सरसकट नुकसान भरपाई द्या. अन्यथा कर्जमुक्ती द्या. फेब्रुवारीमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील. मग आचारसंहिता लागतील. जगभरातील नेते मुंबईत येतील आणि वाट्टेल ती आश्वासने देतील”, अशीही टीका त्यांनी केली.
अवयव विकायचा अविचार करू नका
शेतकऱ्यांना चार दिवस उपाशी फिरण्याची वेळ येते. त्यामुळे अन्नदात्याची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आत्महत्येचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या घराचे आधार आहात. तुम्ही कितीही टाहो फोडलात तर सरकारला ऐकायला तयार नाही. मग तुमच्यामागे तुमच्या कुटुंबाच्या मागे कोण उभे राहील? अवयव विकायचा अविचार करू नका. हे सरकार सगळंच विकतंय, त्यात तुम्ही अवयव विकायला लागले तर त्यांना हवंच आहे”, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
