परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी महायुतीची मोट या निवडणुकीत बांधलेली असेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. किंबहुना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अलीकडेच भाजप कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळाची असल्याचे घोषित केले होते. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये सध्या या निवडणुकांवरून वेगवेगळे मतप्रवाह सुरू आहेत.
ऐन दिवाळीच्या काळात राजकीय पक्षांनी स्नेहमेळावे आयोजित करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. परभणीत भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची संख्या प्रचंड असून, स्वबळावर ही निवडणूक लढवली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे वक्तव्य यापूर्वीच पालकमंत्री बोर्डीकर यांनी भाजपच्या स्नेहमेळाव्यानंतर केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणखी एका मुद्द्यावर कलगीतुरा रंगला.
भारतीय जनता पक्षातील एका विशिष्ट कार्यकर्त्याचे नाव घेऊन या ज्येष्ठ कार्यकर्त्यास जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप मार्फत उमेदवारी दिली जावी, अशी अपेक्षा विटेकर यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. त्यावर भाजपच्या उमेदवारीबद्दल विटेकर यांनी भाष्य करू नये. त्यांच्याही पक्षातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हवाला देऊन त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, असे वक्तव्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर आली असून, आता महायुतीतील पक्षांमध्येही विसंवाद होताना दिसून येत आहे.
अलीकडेच पालकमंत्री बोर्डीकर यांनी भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीत जी बुथ यंत्रणा उभी होती. त्यामुळेच महायुतीचे सर्वाधिक आमदार जिल्ह्यातून निवडून आले, असे वक्तव्य केले होते. एकूणच सध्या महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या राजकीय पुढारी यांची वक्तव्ये होऊ लागली आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या संवाद बैठका सुरू केल्या आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षात सध्या या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचंड आवक सुरू झालेली असून, अलीकडेच काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सध्या तरी परभणी जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षात काँग्रेसजनांची भाऊ गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या भाजपची तयारी स्वबळाचीच असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
मित्रपक्षांच्या प्रतिसादानंतर चित्र स्पष्ट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणूनच जनतेसमोर जाण्याची आमची इच्छा आहे. भाजप व राष्ट्रवादी या महायुतीतल्या पक्षांना आम्ही विचारणा करणार आहोत. त्यांचा प्रतिसाद कसा येतो, यावर पुढची भूमिका ठरेल. महायुतीतल्या अन्य दोन पक्षांपैकी एखाद्या पक्षाची स्वबळाची इच्छा असेल तर दुसऱ्या पक्षासोबत आम्ही युती करू शकतो. लगेचच आम्ही संबंधितांना प्रस्ताव देत आहोत. यावर त्यांचे उत्तर आल्यानंतर आमची भूमिका ठरेल. – आनंद भरोसे जिल्हाप्रमुख शिवसेना (एकनाथ शिंदे)
