रत्नागिरी :रत्नागिरी शहरा जवळच असलेल्या खेडशी येथे आकाशवाणी केंद्रसमोरील गौरव लॉज येथे सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्व्हेषण शाखा आणि ग्रामीण पोलीसांनी एकत्रित धाड टाकली. या धाडीमध्ये अनैतिक व्यवसायासाठी चार मुलीं आणल्याचे उघडकीस आले. त्या मुलींची सुटका करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून लॉज मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवार १३ मे रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. मागील काही दिवसांपासून खेडशी येथील आकाशवाणी केंद्रसमोरील गौरव लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्व्हेषण शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्व्हेषण शाखा आणि ग्रामीण पोलीसांनी गौरव लॉजवर धाड टाकुन कारवाई केली. या कारवाईत मुंबई आणि सुरत येथील चार मुलींची सुटका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत लॉज चालकविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.